सुषमा अंधारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन या सरकारी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. अंधारे यांनी चंद्रकांत पाटील यांनाच पत्र पाठवून याबाबत कळवले आहे. त्यामुळे आता या सगळ्याचे काही राजकीय पडसाद उमटणार का, हे पाहावे लागेल.
सुषमा अंधारे यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
उपरोक्त विषयी समितीच्या समूहावर मी माझे मत विस्तृतपणे नोंदवले आहे व एक पत्र आपले कार्यालयासही पाठवत आहे. तसेच हे पत्र समाज माध्यमावर सर्व चळवळीवर प्रेम करणाऱ्या बांधवांसाठी माहितीस्तव देत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले , कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्व मंडळी आमच्या जगण्याचे आदर्श आहेत. पण गेली काही महिने सातत्याने या महापुरुषांचा अपमान करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून घडवून आणले जात आहे. महामहीम राज्यपाल पदावरील व्यक्तीपासून ते ना. मंत्री, सभागृहातील सदस्यांपर्यंत रोज कुणीतरी महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य आणि महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवणे याची जणू स्पर्धाच लागली आहे.
समितीतील इतर सदस्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांच्या सतत विवेकाचा प्रश्न आहे. मात्र, माझ्यासाठी अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य पदाची जबाबदारी जी साधारण वर्षभरापूर्वी मी स्वीकारली होती. सत्तांतरानंतरही निव्वळ बाबासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी म्हणून ही जबाबदारी घेतलेली होती.
परंतु ही समिती उच्चतंत्र शिक्षण मंत्रालयाच्याच अखत्यारीत येते आणि जर याच खात्याचे मंत्री यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतके हीन दर्जाचे विचार असतील तर समितीतील सदस्य पदापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान आमच्यासाठी लाख पटीने महत्त्वाचा आहे. सबब आपण केलेल्या अक्षयपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मी या समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.