एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात असुद्दीन ओवेसी बोलत होते. गुजरातमध्ये १३ जागांवर निवडणूक लढविणारे असदुद्दीन ओवेसी यांनी भारतीय जनता पक्षाचा विजयाचा मार्ग सुकर केला असा काँग्रेसचा आरोप आहे. यावर या कार्यक्रमात ओवेसी यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर ओवेसी म्हणाले की, आम्ही फक्त १३ जागांवर लढलो, १६९ जागांवर लढलो नव्हतो. तसे पाहिले तर आम्ही १४ जागांवर लढलो. एक जागा काँग्रेसने विकत घेतली होती. तरी देखील काँग्रेसचा त्या जागेवर पराभव झाला, असे ओवेसी म्हणाले.
काँग्रेसची एक समस्या आहे आण ती म्हणजे जान प्यारी भी नहीं जान से जाते भी नहीं. सतत आरोप करणे हे त्याचे काम आहे, असेही ओवेसी यांनी पुढे म्हटले आहे.
काँग्रेसची व्होट बँक संपलेली आहे- ओवेसी
काँग्रेसचे व्होट बँक आता संपलेली आहे. काँग्रेसशी असलेला मुस्लिमांचा रोमान्स किंवा प्रेम आता संपविले पाहिजे. याचे कारण म्हणजे काँग्रेस भाजपला हरवू शकत नाही. म्हणूनच देशातील अनेक राज्यांमध्ये विशेषत: मुस्लिम आणि दलित, आदिवासींनी आपले स्वतंत्र नेतृत्व निर्माण केले पाहिजे, असेही ओवेसी म्हणाले.
राहुल गांधींवरही साधला निशाणा- ओवेसी
आप आणि एमआयएम हे पक्ष निवडणुकीत नसते तर काँग्रेसचा विजय झाला असता का, या प्रश्नाचे उत्तर देताना ओवेसी म्हणाले की, तुम्ही किती आप आणि आप असे करत बसणार आहात… तुम्ही देखील काहीतरी करा ना… तुमचा नेता तर भारतभर पायी फिरत आहे. त्याच्या खांद्यावरही आपण दबाबदारी देऊ का? बाबा बनून फिरत आहेत ते. कुणीसे फार चांगले म्हटले आहे की, यांना हिमाचल प्रदेशात नाही बोलावले म्हणून बरे झाले, नाहीतर तेथेही पराभव झाला असता.
ओवेसी पुढे म्हणाले की, येथे जातीयवाद आहे. ओवेसीला शिव्या देणार मात्र दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना काहीही बोलणार नाहीत. कदाचित त्यांचे नाव ओवेसी नाही म्हणून असेल. आम्ही जिंकलो नाही ही गोष्ट और, आम्ही निकाल स्वीकारतो. आम्ही आमची कमजोरी दूर करू. मात्र मला विचारून लढावे लागेल ही गोष्ट भारताच्या संविधानात कधीपासून आली. मी का विचारू तुम्हाला?