दरम्यान, जो खटकणारा शब्द आहे, त्याबद्दल चंद्रकातदादांनी खुलासा केला आहे. तसंच माफीदेखील मागितली आहे. परंतु त्यानंतरही अशा प्रकारे टार्गेट करणं चुकीचं आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांवर निशाणा साधला आहे. आज लोकं अनुदानाच्या मागे लागतात, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील, या महापुरुषांनी अनुदानाच्या मागे न लागता जनतेच्या पैशातून शिक्षण संस्था उभ्या केल्या, असं चंद्रकांतदादा आपल्या भाषणातून सांगत होते, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पिंपरीत आज नेमकं काय घडलं?
‘महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या तेव्हा सरकारने त्यांना अनुदान दिलेलं नव्हतं. तर या महापुरुषांनी लोकांकडे भीक मागितली,’ असं वक्तव्य औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केलं. पाटील यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत निषेध व्यक्त केला. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील हे पिंपरी चिंचवडमधील एक कार्यक्रम आटोपून निघत असताना अचानक समोर आलेल्या एका व्यक्तीने पाटील यांच्या तोंडावर शाईफेक केली.
दरम्यान, शाईफेकीची घटना घडली तेव्हा चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्तेही होते. मात्र, काही कळण्याच्या आत त्यांच्यावर शाईफेक झाल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षारक्षकांनी शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पाठलाग करत ताब्यातही घेतले. ही शाईफेक झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी ‘चंद्रकांत पाटील यांचा धिक्कार असो’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा विजय असो’, ‘महात्मा फुले यांचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.