Chandrakant Patil police suspnded | पुण्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड दौऱ्यादरम्यान एका व्यक्तीने शाईफेक केली. पोलिसांनी त्या व्यक्तीला जागेवरच पकडून ताब्यात घेतले. त्याच्या काही साथीदारांना देखील ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. या घटनेने पिंपरी चिंचवड.परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हायलाइट्स:
- चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली
- या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती
- चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र भाजपमधील वजनदार नेत्यांपैकी एक आहेत
शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी काहीवेळातच प्रसारमाध्यमांसमोर येत आक्रमकपणे प्रतिक्रिया दिली होती. माझ्यावर असे भ्याड हल्ले झाले तरी मी घाबरणार नाही. विरोधकांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्यासमोर येऊ दाखवावे, असे चंद्रकांत पाटील यांनी त्वेषाने सांगितले होते. चंद्रकांत पाटील हे शनिवारी मोरया गोसावी महोत्सवासाठी आले होते. या कार्यक्रमाला जायच्या आधी ते कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरातून निघताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. ही शाईफेक झाल्यानंतर शाई फेकणाऱ्यांनी ‘निषेध असो, निषेध असो’, ‘चंद्रकांत पाटील यांचा धिक्कार असो’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा विजय असो’, ‘महात्मा फुले यांचा विजय असो’,अशा घोषणा दिल्या होत्या.
भिकारड्यासारखा बोलतोय, असं म्हंटल्यावर काय वाटेल?; अजित पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा समाचार
चंद्रकांत पाटील यांच्याकडून पोलिसांवर कारवाई न करण्याची विनंती
चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र भाजपमधील वजनदार नेत्यांपैकी एक आहेत. ते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. आता ते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याभोवती नेहमीच कडेकोट सुरक्षा असते. मात्री, ही सुरक्षा भेदून समता दलाच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याने एकच खळबळ उडाली होती. एवढी सुरक्षा असूनही चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत समता दलाचे कार्यकर्ते पोहोचलेच कसे, असा सवाल विचारला जात आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्यात पोलिसांचा कोणताही दोष नसल्याचे सांगितले होते.
पोलिसांना दोष देण्याचं काही कारण नाही. मी पोलिसांना दोष देणार नाही. पोलिसांनी तरी कुणा-कुणावर लक्ष ठेवायचं. माझ्यावर शाईफेक झाली त्यावेळी माझ्यासोबत उपस्थित असणाऱ्या पोलिसाचं निलंबन वगैरे मी होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी हात जोडून विनंती करतो, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र, गृहखात्याकडून अवघ्या काही तासांमध्ये ११ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.