शाईफेक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना ललकारले होते. यावेळी चंद्रकांतदादांनी अजित पवार यांचाही उल्लेख केला होता. त्याबाबत अजित पवार यांनी भाष्य केले. मला चंद्रकांत पाटील यांना अजिबात चॅलेंज द्यायचे नाही. तुम्ही तुमचे काम करा, मी माझं काम करत आहे. पण चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे चूक होते, असे अजित पवार यांनी म्हटले.
कोणी मोठी व्यक्ती असली की त्याला एक्स किंवा वाय दर्जाची सुरक्षा दिली जाते. कुठल्याही व्यक्तीवर अशाप्रकारे शाई फेक करू नये. वैचारिक मतभेद असतील,पण कायदा हातात कोणी घेऊ नये. आपण बोलताना कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शालजोडीतील शब्द वापरता येतात, पण कालची गोष्ट चूक होती.आपण बोलताना महापुरुष टाळून बोललं पाहिजे, बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे, असेही अजित पवार यांनी म्हटले.
यावेळी अजित पवार यांनी समृद्धी महामार्गाच्या उद्घानाबाबत समाधान व्यक्त केले. या रस्त्यामुळे अनेक गाव जोडणारा,वेळ कमी होईल.पुढचा टप्पा लवकर होण्याकरता काम सुरू होईल. आमच्या सरकार काळातही समृद्धी महामार्गला मदत दिली,आम्ही उदघाटन करणार होतो पण एका ब्रिजचं काम राहील त्यामुळे नाही करता आले. त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले. काही अडचणी आहेत,पण होईल सगळं काम,मोठा रस्ता होत आहे, याबाबत अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले.
चंद्रकांतदादांच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी, ११ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई
चंद्रकांत पाटील हे शनिवारी मोरया गोसावी महोत्सवासाठी आले होते. या कार्यक्रमाला जायच्या आधी ते कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरातून निघताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्याभोवती नेहमीच कडेकोट सुरक्षा असते. मात्र, एवढी सुरक्षा असूनही चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत समता दलाचे कार्यकर्ते पोहोचलेच कसे, असा सवाल उपस्थित झाला होता. या घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ११ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये ८ पोलीस कर्मचारी आणि तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.