म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईमधील महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या निर्भया पथकासाठी नियोजित निधीमधून खरेदी करण्यात आलेली पोलिस वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याबद्दल राज्यातील विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. निर्भया पथकातील वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जाणे हा अत्यंत नीच प्रकार असल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तर निर्भया निधीतून घेतलेली वाहने त्वरित पोलिस ठाण्यात पाठविण्यात यावीत. आमदारांच्या सुरक्षेपेक्षा आम्हाला महिला भगिनींची सुरक्षा जास्त महत्त्वाची वाटते, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

‘निर्भया पथकातील वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जाणे हा अत्यंत नीच प्रकार आहे. निर्भया पथके कशासाठी नेमली गेली, हे सर्वांना माहिती आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तत्काळ मदत मिळावी, सहकार्य मिळावे, त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखले जावे, त्यासाठी ही पथके तयार करण्यात आली होती. आज त्या पथकातल्या गाड्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येत असतील तर त्यांची वृत्ती काय आहे, हे आता लोकांना कळले पाहिजे’, अशा शब्दांत ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भातील बातम्यांची काही कात्रणे ट्वीटरच्या माध्यमातून शेअर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना लक्ष्य केले. जुलै महिन्यापासून शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे, याकडे लक्ष वेधले. एकीकडे मुख्यमंत्री जनता त्यांच्याबरोबर असल्याचा दावा करतात, दुसरीकडे ते त्यांच्या प्रत्येक समर्थक आमदार व खासदाराला पाच पोलिसांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा देतात. जनता त्यांच्याबरोबर असेल तर मग त्यांना नक्की भीती कशाची वाटते आहे, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे. निर्भया निधीतून घेतलेली वाहने ही पोलिस ठाण्याला त्वरित पाठविण्यात यावीत. आमदारांच्या सुरक्षेपेक्षा राज्यातील जनता व महिला भगिनींची सुरक्षा आम्हाला जास्त महत्त्वाची वाटते, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here