Chandrakant Patil Ink attack in Pune | पिंपरी येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती. त्यानंतर राज्य सरकारने ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच शाई फेकणाऱ्या कार्यकर्त्यांवर खुनाच्या गुन्ह्याचे कलम लावल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर शाईफेकीची घटना कॅमेऱ्यातून टिपणाऱ्या पत्रकारांविरोधातही चंद्रकांत पाटील कमालीचे आक्रमक झाले आहेत.

हायलाइट्स:
- महाराष्ट्रात सध्या कटुतेचा स्फोट झाला आहे
- या वातावरणास भाजपच जबाबदार आहे
- फुले, आंबेडकर आणि भाऊरावांनी भीक मागितील हे वक्तव्य चूक
या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘सामना’तून चंद्रकांत पाटील आणि शाईफेकीच्या प्रकरणाबाबत सविस्तरपणे भाष्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सध्या कटुतेचा जो स्फोट झाला आहे, या वातावरणास भाजपच जबाबदार आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी येथे शाईफेक झाली. अशा घटनांचे समर्थन करता येणार नाही. पण शेवटी पेरले तेच उगवताना दिसत आहे. पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्यामुळे शाईफेकीचा स्फोट झाला, असे म्हटले जाते. पण महाराष्ट्रातील एक वर्ग वेगळेच सांगतो आहे. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटी येथे कामाख्या देवीची वेगळ्या पद्धतीने पूजाअर्चा करून आले. तेथे तंत्र, मंत्र, करणी वगैरे प्रकार केले जात असल्याची वदंता आहे. शिंदे गटाच्या खासदारांनी तिकडे जाऊन नक्की काय केले ते त्यांनाच माहीत, पण तेव्हापासून महाराष्ट्रातील भाजप मंत्री व पुढाऱ्यांची डोकी साफ भरकटून गेली आहेत. ते वेड्यासारखे बरळू लागले आहेत. त्यामुळे शिंदे गटाने नक्की कोणाविरोधात जारण-मारण केले, असा प्रश्न महाराष्ट्राला पडला असल्याचे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
चंद्रकांतदादांवर शाई फेकणाऱ्यावर ३०७ चा गुन्हा; असिम सरोदे यांनी सरकारला सुनावलं
फुले, आंबेडकर, कर्मवीर अत्यंत स्वाभिमानी: सामना
महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, कर्मवीर पाटील यांनी ‘लोकवर्गणीतून संस्था उभ्या केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबत सांगायचे तर, बहुजन समाजाला इतरांच्या बरोबरीने स्थान मिळाले पाहिजे, जाती- जमातीचे भूत गाडले गेले पाहिजे या विचाराने. महात्मा फुले यांच्या संदर्भात प्रा. हरी नरके यांनी चांगली माहिती समोर आणली आहे. ते सांगतात, “फुले, आंबेडकर, कर्मवीर हे स्वाभिमानी होते. त्यांनी कधीही कोणाकडेही भीक मागितली नाही. फुले पक्षाघाताने आजारी होते तेव्हा उपचारासाठीही पैसे नव्हते, पण त्यांनी त्यासाठी कोणाकडे मदतीची याचना केली नाही. बाबासाहेबांना ‘बुद्ध ऍण्ड हिज धम्म’ हा ग्रंथ छापायचा होता. त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण त्यांनी कोणापुढे हात पसरले नाहीत. कर्मवीरांनी पत्नीचे दागिने विकले, पण पैशाअभावी मुलांचे शिक्षण थांबू दिले नाही. जोतिराव, सावित्रीबाई आणि त्यांचे सहकारी पदरमोड करून शाळा चालवीत असत. बाबासाहेबांनी गरीबांच्या शिक्षणासाठी खूप खस्ता खाल्ल्या. बाबासाहेब हे तर स्वाभिमानाचा एक धगधगता ज्वालामुखीच होते, असे आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे ते खरेच आहे. महाराष्ट्राच्या विद्यमान उच्च शिक्षणमंत्र्यांचा अभ्यास कच्चा असल्यानेच त्यांनी महापुरुषांनी शाळा चालविण्यासाठी भीक मागितली असे म्हटले, असे म्हटले. शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रात महापुरुषांच्या बदनामीचा जिहाद पुकारला आहे का? महाराष्ट्र सरकार सध्या ‘लव्ह जिहाद’विरुद्ध कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. पण त्यापूर्वी सरकारने शिवराय, फुले, आंबेडकरांच्या विरोधात वळवणाऱ्या जिभांना आवर घालणारा कायदा करा, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.