निशांत जाधव (वय २५, रा. धनकवडी) या तरुणावर हा हल्ला झाला आहे. या प्रकरणी मनोहर रघुनाथ मांगडे (वय ४४), ऋषिकेश जयसिंग देशमुख (वय ३०, दोघे रा. मांगडेवाडी, कात्रज) यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत निशांत जाधव यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत जाधव आणि त्याचा मित्र मांगडेवाडी भागातील मल्हार फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी जाधव आणि त्याचे मित्र मोठ्याने गप्पा मारत होते. त्यावेळी रेस्टॉरंट मालक मनोहर मांगडे आणि देशमुख यांनी निशांतला मोठ्याने बोलू नका, असे सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला.
याच वादावादीतून मांगडे आणि देशमुख यांनी निशांत आणि त्याच्या मित्रावर चाकूने वार केले. या घटनेत चौघे जखमी झाले आहेत. रेस्टॉरंटमधील वेटरने दोघांना बांबूने मारहाण केली. या घटनेत हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मांगडे आणि देशमुख यांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात पुढील तपास करत आहेत.