मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच वादात सापडले आहेत. आधी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आणि नुकतंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली. तसंच कोश्यारी यांना पदावरून हटवण्याचीही मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांनी आपली बाजू मांडत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.

‘महापुरुषांच्या अवमानाची मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगितला. मात्र या व्यक्तींच्या कामाचा आदर करणं म्हणजं महापुरुषांचा अनादर नव्हे,’ असं म्हणत राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. तसंच करोना साथीच्या काळात अनेक लोक घरात बसलेले असताना मी महाराष्ट्रभर फिरलो आहे, गड-किल्ल्यांवर गेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श फक्त महाराष्ट्रपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशासाठी आहे, असंही राज्यपालांनी अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

मोठी बातमी: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर; तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा

माझ्याकडून एखादी चूक झाली तर खेद व्यक्त करण्यात मला कधीही कमीपणा वाटत नाही. मात्र महापुरुषांबाबत मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, अशा आशयाचं पत्र भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलं आहे.

दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभर रोष व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे याची दखल घेत कोश्यारी यांना पदावरून हटवलं जाईल, अशी चर्चा होती. मात्र आता त्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर आपली बाजू मांडल्यानंतर त्यांच्यावरील संभाव्य कारवाई टळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नक्की काय म्हणाले होते कोश्यारी?

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं होतं की, ‘आम्ही जेव्हा शाळेत जायचो, तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे, तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तीचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते आयडॉल कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील,’ असं कोश्यारी यांनी म्हटलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here