जळगाव : जळगाव शहरातील मेहरूण येथे राहणाऱ्या तरूणाचा तिक्ष्ण हत्यार आणि दगडाने वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना सोमवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदीराजवळ घडली आहे. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (३३) असे मृत तरुणाचे नाव आहे. भाडेकरावरील घरात राहणाऱ्या विवाहितेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सोमवारी खून करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

जळगाव शहरातील मेहरून येथे प्रमोद शेट्टी हा तरूण आईवडील,पत्नी व मुलांसह वास्तव्याला होता. गेल्या आठ वर्षांपासून भूषण हा बांभोरी येथील विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता. शनिवार १० डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे विद्यापीठात कामाला निघून गेला. दिवसभर काम करून सायंकाळी ४ वाजता कामावरून घरी जाण्यासाठी निघाला. परंतु रात्री उशीरापर्यंत घरी आला नाही.

भारतीय-चिनी सैनिकांमध्ये झटापट, ३० जखमी, कोश्यारींचे अमित शहांना पत्र; वाचा, टॉप १० न्यूज
याबाबत पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आलेली होती. सोमवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास निमखेडी शिवारातील गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदीराजवळ प्रमोद शेट्टीचा मृतदेह बकऱ्या चारणाऱ्या काही मजुरांना आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यावेळी मंदीराजवळ प्रमोदची दुचाकी देखील मिळून आली. त्याच्या मानेवर तिक्ष्ण हत्यार आणि दगडाने वार करून निर्घृण खून केल्याचे दिसून आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मृत प्रमोदच्या पश्चात आई, वडील, पत्नी मोहिणी, मुलगा तुषार आणि मुलगी श्रध्दा असा परिवार आहे.

शाईफेक प्रकरणात राज ठाकरेंची मध्यस्थी; शिंदे, फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना केले फोन आणि…
खून करून जंगलात लपून बसले होते दोघे…पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मृत प्रमोद याचे घर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने त्यांच्याकडूनही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. तपास चक्र फिरवल्यावर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाला हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती समोर आली. खून करणारे संशयित हे जळगाव तालुक्यातील उमाळा येथील जंगलात लपून बसले असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सुधीर सावळे, किशोर पाटील, इम्रान सैय्यद, हेमंत कळकसर, छगन तायडे, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, योगेश बारी, गोविंदा पाटील यांच्या पथकाने सत्यराज नितीन गायकवाड (२६), सुनिल लियामतखाँ तडवी(२६), या दोघांना अटक केली.

सीमावाद : सीमेलगतच्या गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट, ३७ वर्षे आहेत पाण्याच्या प्रतीक्षेत, पाहा विशेष रिपोर्ट
पुढील कारवाईसाठी दोघांना जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कट रचून दोघांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here