म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांनी अती वाईट हवा अनुभवल्यानंतर हवेची गुणवत्ता थोडी सुधारू लागली आहे. मात्र अशा प्रकारे येत्या काळात सलग काही दिवस अती वाईट किंवा वाईट हवा अनुभवण्याच्या कालावधीत वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सध्या मंदौस चक्रीवादळानंतर वाऱ्यांचा वेग पुन्हा वाढला असून हवेच्या गुणवत्तेत किंचित सुधारणाही झाली आहे. मात्र येत्या काही वर्षांमध्ये या अनुभवातील सातत्य वाढू शकते.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी (आयआयटीएम) अंतर्गंत असलेल्या ‘सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च’चे (सफर) संस्थापक प्रकल्प संचालक डॉ. गुफरान बेग यांनी वातावरणीय घटकांमुळे मुंबईतील वाऱ्याचा वेग मंदावल्याचे सांगितले. गेल्या दोन महिन्यांत हवामानाच्या परिस्थितीत मोठे बदल दिसून आले आहेत. ला निनामुळे भारतात अनैसर्गिक गारठा आणि विस्तारीत हिवाळा अनुभवायला येत असून, यापुढेही हा अनुभव येईल, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर भूमध्य समुद्राच्या तापमानवाढीचा प्रभाव देशाच्या पश्चिम भूभागावर आहे. यामुळे मुंबई प्रदेश आणि सभोवतालाच्या पश्चिम भारताच्या भागात वाऱ्यांचा वेग फारसा नाही. यामुळे प्रदूषकेही वातावरणात साचून राहिल्याचे बेग यांनी स्पष्ट केले. या घटनांचा संबंध वातावरण बदलाशी असू शकतो.

हवेची गुणवत्ता घसरण्यासाठी केवळ औद्योगिक स्रोतांद्वारे होणारे प्रदूषण हे कारण नसून मुंबईतील बांधकामांचाही परिणाम यावर होत आहे. मुंबईची दृश्यमानताही या काळात बाधित झाली होती. त्यामुळे यामध्ये अती सूक्ष्म प्रदूषकांसोबतच तुलनेने मोठ्या आकाराचीही प्रदूषके होती. प्रदूषणाच्या नोंदींच्या माध्यमातून पीएम २.५ सोबतच पीएम १०चे प्रमाणही वाढलेले दिसले. त्यामुळे यामध्ये बांधकामांमधून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचाही वाटा असल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता

१ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान २२ दिवस मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट आणि अती वाईट होती. यातील चार दिवस अती वाईट होते. सन २०२१ मध्ये १ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या दरम्यान अती वाईट गुणवत्ता नोंदली गेली नव्हती, तर वाईट हवेचे सहा दिवस होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here