आज बाजारात तेजीसह व्यवसाय सुरू झाला. सेन्सेक्स ११३ अंकांच्या वाढीसह ६२,२४३ वर तर निफ्टी ३५ अंकांच्या वाढीसह १८,५३२ अंकांवर उघडला. सततच्या घसरणीनंतर आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. निफ्टी बँकेतही मोठी तेजी आहे आणि ०.३२ टक्क्यांच्या वाढीसह ४३,८५० वर व्यवहार करत आहे. बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे निफ्टी बँकेने ४३,८७० चा सार्वकालीन उच्चांक गाठला. निफ्टी बँकेत १२ पैकी १० समभाग तेजीसह व्यवहार करत असून बंधन बँक ३ टक्क्यांच्या उसळीसह व्यवहार करत आहे.
नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर सहा टक्क्यांवर घसरल्यानंतर मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात उत्साह दिसला. मात्र, ऑक्टोबरमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) चार टक्क्यांची घसरण झाली आणि बुधवारी फेडच्या निर्णयाबाबत गुंतवणूकदारांच्या सावध वृत्तीमुळे बाजारातील तेजी मर्यादित राहिली.
निफ्टीवर चमकले हे समभाग
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीवर टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक १.५० टक्क्यांनी वाढले. यासोबतच एचसीएल टेकमध्ये ०.९९ टक्के, इंडसइंड बँकेत ०.९७ टक्के, टेक महिंद्रामध्ये ०.९३ टक्के आणि हीरो मोटोकॉर्पमध्ये ०.७९ टक्के वाढ दिसून आली.
या शेअर्समध्ये घसरण दिसली
निफ्टीवर बीपीसीएल शेअर्स सुरुवातीच्या व्यापारात ०.८३ टक्क्यांच्या कमाल घसरणीसह व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे अपोलो हॉस्पिटलमध्ये ०.७९ टक्के, पॉवरग्रीडमध्ये ०.७० टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) ०.६६ टक्क्यांनी आणि एनटीपीसीमध्ये ०.३८ टक्क्यांनी घट झाली.
जागतिक बाजारातून चांगले संकेत
अमेरिकन बाजार मोठ्या तेजीने बंद झाला आहे. डाऊ जोन्स ५२८ अंकांनी तर नॅस्डॅक १३९ अंकांच्या वाढीसह बंद झाला. त्यानंतर आशियाई शेअर बाजारांमध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे, जी भारतीय बाजारासाठी चांगली चिन्हे आहेत. निक्केई ०.३७ टक्के, स्ट्रेट टाइम्स १.०२ टक्के, हँगसेंग ०.५८ टक्के, कोस्पी ०.२० टक्के, सेट कंपोझिट ०.१६ टक्के, जकार्ता ०.६३ टक्के, शांघाय ०.०५ टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहेत. मात्र, फक्त तैवानचा शेअर बाजारात घसरण दिसत आहे.
किरकोळ महागाईत घट
नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.८८ टक्क्यांवर ९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. एप्रिलमध्ये महागाईचा दर ७.७९ टक्क्यांवर पोहोचला होता. त्यानंतर आरबीआयने रेपो रेट पाच वेळा वाढले आणि रेपो दर ४ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांपर्यंत वाढला, परिणामी सर्वसामान्यांसाठी कर्जाचे दर वाढले. मात्र, देशातील औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) ४ टक्क्यांची घसरण झाली आहे.