९० फायटर जेट असलेल्या अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरिअरने मलक्का स्ट्रेट मार्गे हिंदी महासागराच्या हद्दीत प्रवेश केला. चीनचा सर्वाधिक व्यापार या मार्गावरूनच होतो. तर, दुसरीकडे भारतानेदेखील जग्वार लढाऊ विमानांना अंदमान-निकोबारमध्ये तैनात करत चीनला इशारा दिला आहे. लडाखमध्ये घुसखोरी करणारा चीन भारताला अडचणीत आणण्यासाठी हिंदी महासागरावर आपले वर्चस्व वाढवत आहे. बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातही चिनी नौदलाच्या युद्धनौकांची गस्त वाढली आहे. भारताला अडचणीत आणण्यासाठी चीन या मार्गांचा वापर करत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिका-भारतीय नौदलाने केलेल्या युद्धाभ्यासाला मोठे महत्त्व आले आहे.
मागील काही वर्षांपासून चिनी नौदलाने समुद्री चाच्यांविरोधात कारवाई करण्याच्या नावाखाली पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापासून आफ्रिकेच्या लाल समु्द्रापर्यंत चीनने गस्त वाढवली आहे. त्याशिवाय मागील काही वर्षांत चीनने आपली पाणबुडी जहाज हिंदी महासागरात सातत्याने पाठवल्या आहेत. चीनच्या नौदलाने आता भारतीय सागरी सीमापर्यंत धडक दिली असल्याचे चित्र आहे. कराची आणि कोलंबोच्या बंदरात चीनच्या पाणबुडी आल्या आहेत. काही वेळेस या पाणबुडींचा रस्ता सुकर करण्यासाठी चीनने सामान्य व्यापारी जहाजदेखील पाठवले असल्याचे तज्ञ सांगतात. चीनच्या नौदलाने म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान, मालदीव, इराण आणि जिबुतीमधील बंदरावर ठाण मांडले आहे. भारताला घेरण्यासाठीच नव्हे तर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनच्या नौदलाला आव्हान देण्यासाठी चीन प्रयत्न करत आहे.
वाचा:
वाचा:
चीनचा संभाव्य धोका ओळखून भारतीय नौदलही सज्ज झाले आहे. नौदलाच्या इस्टर्न नवाल कमांडने अंदमान-निकोबारमध्ये सराव सुरू केला आहे. यामध्ये युद्धनौकाही सहभागी असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, दुसरीकडे भारताने फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसोबत नौदल सहकार्याबाबत करार केले आहेत. त्यामुळे हिंदी महासागरात भारतीय नौदलाला ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि अमेरिकेच्या नौदल तळाचा वापर करता येणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times