रविवारी दुपारी पूर्व बर्दमानच्या एका लॉजच्या चौथ्या मजल्यावरील ५०६ क्रमांकाच्या खोलीत तरुण तरुणीचा मृतदेह आढळला. दोघांच्या गळ्यात फुलांचे हार होते. तरुणीच्या कपाळावर कुंकू होतं. महादेव माजी (२०) आणि प्रियंका मित्रा (१८) अशी दोघांची नावं आहेत. महादेव माजी बांकुडा जिल्ह्यातील इंडसमधील दिघल गावचा रहिवासी आहे. प्रियंकादेखील मूळची बांकुडचीच रहिवासी आहे. मात्र ती कुटुंबासोबत बर्दमानच्या इचलाबाद परिसरात भाड्यानं राहते. महादेव रंगारी म्हणून काम करायचा.
महादेव शनिवारी संध्याकाळी लॉजवर आल्याची माहिती शालिमार लॉजचा अकाऊंटंट तापशकांती मंडलनं दिली. ‘महादेव बंगळुरूहून आला. एक रात्र थांबून सकाळी निघून जाईन असं त्यानं सांगितलं होतं. त्यानं आधार कार्डची प्रत दिली होती. त्यानंतर ५०६ क्रमांकाची खोली त्याला देण्यात आली,’ असं मंडलनं सांगितलं.
‘दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी महादेव खोलीच्या बाहेर पडला. काही वेळानं तो प्रियंका मित्राला सोबत घेऊन आला. लॉजमधील कर्मचाऱ्यांनी त्याला प्रियंकाबद्दल विचारणा केली. त्यावर ती माझी बहिण असून थोड्याच वेळात निघून जाईल, असं उत्तर महादेवनं दिलं होतं,’ असं मंडल म्हणाला.
बराच वेळ कोणीच खोलीबाहेर न आल्यानं कर्मचाऱ्यांनी दार ठोठावलं. आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. याची माहिती व्यवस्थापकानं पोलिसांना दिली. काही वेळानं पोलीस पोहोचले. त्यांनी दरवाजा तोडला. आतमध्ये दोघांचे मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत सापडले. दोघांच्या गळ्यांमध्ये फुलांचे हार होते. तरुणीच्या गळ्यात कुंकू होतं. पोलिसांनी दोघांचे मृतदेह खाली उतरवले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.