या पुलासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने पालिकेने प्रथम फेब्रुवारी, २०२२मध्ये निविदा प्रक्रिया राबवली, तेव्हा केवळ एकाच कंत्राटदराने निविदा भरली होती. त्यामुळे ही निविदा रद्द करण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत १,५०० कोटी रुपये होती. १० ऑक्टोबर, २०२२ रोजी दुसऱ्यांदा निविदा मागवण्यात आल्या. आणखी काही कंत्राटदारांनी निविदा स्पर्धेत सहभागी व्हायची विनंती केल्याने ‘सी’ पाकिट उघडण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
खाडीदरम्यान ‘व्हुइंग गॅलरी’
‘प्रस्तावित पुलाच्या मार्गात भाईंदर खाडीजवळ खारफुटी असून, ती न हटवता तेथे आधी सुमारे ५० मीटर अंतराचे गर्डर उभारण्याचे ठरवण्यात आले होते. त्याऐवजी आता ३०० मीटरचा सलग एकच गर्डर बांधला जाणार आहे. हा पट्टा ‘व्हुइंग गॅलरी’सारखा असून, दहिसर व भाईंदर या दोन्ही भागातून ही गॅलरी दिसेल, असा नवीन बदल या कामात करण्यात आला आहे. या ठिकाणी नागरिक, पर्यटक येणार असल्याने वाहनतळ व इतर सुविधा तसेच सहा ठिकाणी आंतरबदल करण्यात येणार आहेत, त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे’, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय कौंडण्यपुरे यांनी दिली.
सन २०१८च्या दर सूचीनुसार हे कंत्राट देण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही. पुलाच्या कामात काही बाबींची वाढ झाल्याने सुमारे ९०० कोटी रुपये खर्च वाढला आहे. – संजय कौंडण्यपुरे, मुख्य अभियंता पूल विभाग, मुंबई महापालिका