बीड : आजपर्यंत आपण जमिनीच्या तुकड्यासाठी मालमत्तेसाठी रक्ताचं नात्यांमध्ये फूट पडल्याचं पाहिलं आहे. मात्र, ३२ वर्षांपूर्वी घरातून पैसे कमावण्याच्या नादात निघून गेलेल्या चुलत्याला पुतण्यांनी २ हजार किलोमीटरचा प्रवास करत परत आणलं आणि पुन्हा एकदा २ भावांसह बहिणींची भेट घालून दिलीय.

५ भाऊ आणि ४ बहिणी असं कुटुंब. परिस्थिती हलाखीची असल्याने कोणालाही न सांगता २१व्या वर्षी कामासाठी रमेश माणिकराव उबाळे यांनी गाव सोडले. तब्बल ३२ वर्षे हॉटेलवर वेटर म्हणून काम केले. परंतु एका कोल्हापूरच्या व्यक्तीने तयार केलेल्या व्हिडीओने नातेवाइकांना ७ दिवसांपूर्वी माहिती मिळाली. अन पुतण्यांनी कसलाही विचार न करता २ हजार किमीचा प्रवास करत पश्चिम बंगाल गाठले आणि आपल्या चुलत्याला घेऊन बीडच्या चऱ्हाठा गावात दाखल झाले. तब्बल ३२ वर्षानंतर भेट होणार या निमित्ताने पाहण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना अश्रू अनावर झाले.

उद्यापासून लसीकरण! गोवर प्रतिबंधासाठी दोन टप्प्यांमध्ये विशेष मोहीम
रमेश उबाळे हे वयाच्या २१व्या वर्षी म्हणजे १९९१ला पैसे कमवण्यासाठी आपले भाऊ, बहीण, आई, नातेवाईकांना सोडून मुंबईला गेले. तिथून ते रेल्वेने पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे गेले. तेथे त्यांनी कृष्णा नावाच्या हॉटेलमध्ये काम सुरू केले तर ते आजतागायत तिथेच काम करत राहिले. तब्बल ३२ वर्ष ते एकाच हॉटेलमध्ये राहिले. इकडे भाऊ नारायण उबाळे यांनी दोन वेळा बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली, परंतु भावाचा शोध लागला नाही. अखेर कोल्हापूर येथील प्रकाश पानसरे नामक व्यक्ती मदतीसाठी धावून आला.

पानसरे यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून ते जेवणासाठी कृष्णा हॉटेलवर थांबले होते. त्यांनी विचारपूस केली असता उबाळे यांनी ते बीड जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. त्यांनी रमेश उबाळे यांचा एक व्हिडीओ तयार केला. गुगलवरून चऱ्हाठा गाव शोधले आणि शेवटी त्यांना एका पान टपरीचा संपर्क मिळाला. टपरी चालकाला फोन करून त्याच्या व्हॉट्सॲपवर तो व्हिडीओ पाठवला. टपरी चालकानेही लगेच गावातील ग्रुप आणि सर्व उबाळे नावाच्या लोकांपर्यंत तो पोहोचवला.

हा आपलाच भाऊ असल्याचे खात्री पटताच उबाळे बंधूंनी पानसरे यांना संपर्क करून हॉटेलचा पत्ता मिळवला. हॉटेल चालकाशी बोलून पोलिसांनाही कल्पना दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष उबाळे यांनी पत्र दिल्यावर लगेच दत्ता व कैलास उबाळे हे दोन पुतणे चुलत्याला आणण्यासाठी रवाना झाले. त्यांनी चुलते रमेश उबाळे यांना सोबत घेत मध्यरात्री १ वाजेला आपलं गाव गाठलं. पंरतू अगोदर ते बीड शहरातील त्यांच्या बहिणीच्या घरी गेले आणि यावेळी वृद्ध झालेल्या बहिणीला आईने तुझी खूप वाट पाहिली, असं म्हणत अश्रू अनावर झाले.

तर याविषयी भावांनी देखील आपली प्रतिक्रिया देत आज आमची खरी दिवाळी आहे. त्यामुळे सर्व कुटुंबातील सदस्य आनंदी असून आनंदोत्सव साजरा करत आहोत, असं म्हणाले. तर याविषयी ३० वर्षीय पोलीस दलात काम करणारे पुतणे म्हणाले की, “माझ्या जन्मापूर्वी माझे चुलते गाव सोडून गेले होते. माझे वडील आज हयात नाहीत. मात्र, आज माझे चुलते आल्याने मला त्यांच्या रूपाने वडील आल्याचं जाणवत आहे”.

मोठी बातमी,नाशिकमधील नेत्ररोगतज्ज्ञ प्राची पवार जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी,नाशिकमध्ये खळबळ, पोलिसांकडून तपास सुरु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here