त्यानंतर काही वेळाने या ठिकाणी ४० मिनिटाच्या आत त्याची आई म्हणजेच मादी बिबट्या तेथे येऊन तिच्या पिल्लूला घेऊन गेली. हे संपूर्ण दृश्य येथे लावण्यात आलेल्या वन विभागाच्या कॅमेरात कैद झाले आहे. पिल्लू बऱ्याच वेळ पाण्यात राहिल्याने कुडकुडत होतं. त्यात अजून नाशिकमध्ये असलेली थंडी आणि त्याचा असलेला जीव पाहता उपस्थित नागरिकही हळहळ व्यक्त करत होते. बिबट्याचा या परिसरात वावर असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिक शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर जास्त प्रमाणात वाढला आहे. अन्न पाण्याच्या शोधात बिबट्यांचा वावर आता शहराकडे होऊ लागला आहे.
दरम्यान, बिबट्याचं पिल्लू पाण्याच्या शोधात असताना विहिरीत पडल्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. त्यानंतर बिबट्याच्या पिल्लाने पिंजऱ्यात उडी घेतली आणि सुरक्षितरित्या सोडून देण्यात आले असल्याची माहिती देखील वन विभागाने दिली आहे.
मागच्या आठ ते पंधरा दिवसांपूर्वीच नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात बिबट्या मादी आणि पिल्लांची भेट काही नागरिकांच्या मदतीने वनविभागाने घडवून आणली होती. ही घटना वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरा मध्ये कैद झाली होती. त्यानंतर काल सायंकाळच्या सुमारास एका शेतातील विहिरीत बिबट्या पडला होता. त्या बिबट्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू करून बाहेर काढल्यानंतर बिबट्या मादी आणि पिल्लांची भेट घडवून देण्यात आली आहे. पिल्लांचा म्हणजेच आई आणि लेकरांच्या भेटीचा प्रसंग ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे.