सेक्टर ३ मध्ये वास्तव्यास असलेला शंभुनाथ यादव यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली. शंभुनाथ पशुपालन करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी देशराज नावाच्या व्यक्तीला ४० हजारांत म्हैस विकली. देशराज यांनी ३० रुपये रोख दिले आणि १० हजार नंतर देईन असं सांगितलं. मात्र नंतर तो पैसे देण्यास काचकूच करू लागला. त्यामुळे शंभुराज यांनी देशराजविरोधात सेक्टर ३ पोलीस चौकीत तक्रार दिली.
उपनिरीक्षक महेंद्रपाल यांच्याकडे प्रकरणाचा तपास देण्यात आला. देशराज पैसे देत नसल्यानं शंभुनाथ यांचा नातू देशराजच्या घरातून त्याची गाय घेऊन आला. गाय गायब झाल्याची तक्रार देशराजनं पोलिसांत नोंदवली. महेंद्रपाल यांनी शंभुनाथ यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी १० हजार रुपयांची मागणी केली. शंभुनाथ यांनी शनिवारी महेंद्रपाल यांना ४ हजार दिले. रविवारी २ हजार देताच महेंद्रपालनं आणखी पैसे मागितले. याची माहिती शंभुनाथ यांनी दक्षता पथकाला दिली.
सोमवारी राज्य दक्षता विभागाचे निरीक्षक स्वर्णलाल आणि ड्युटी मॅजिस्ट्रेट विनय अत्री त्यांच्या पथकासह सेक्टर ३ पोलीस चौकीत पोहोचले. शंभुनाथ यांनी महेंद्रपाल यांना फोन केला. महेंद्रपालनं शंभुनाथ यांना कम्युनिटी सेंटरमध्ये बोलावलं. तिथे महेंद्रपाल कुटुंबासाठी लग्नासाठी आला होता. शंभुनाथ यांनी ४ हजार रुपये महेंद्रपाल यांना दिले आणि दक्षता पथकाला इशारा केला. यानंतर महेंद्रपालला रंगेहात पकडण्यात आलं. आरोपीनं पैसे गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकानं टीमनं त्याला तिथेच आडवं केलं आणि त्याच्या तोंडात हात घालून पैसे बाहेर काढले.