Authored by prasad lad | Maharashtra Times | Updated: 14 Dec 2022, 10:14 pm

IND vs AUS : भारताने दमदार गोलंदाजीची सुरुवात करत ऑस्ट्रेलियाची २ बाद ५ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर एलिस पेरीने अर्धशतक झळकावले व ऑस्ट्रेलियाला १७२ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शेफालीने अर्धशतक झळकावले खरे, पण तरीही भारताला विजय मिळवता आला नाही व भारताला आधाडी मिळवता आली नाही.

 

shafali verma
सौजन्य-ट्विटर
मुंबई : लेडी सेहवाग समजल्या जाणाऱ्या शेफाली वर्माने धडाकेबाज अर्धशतक साकारले खरे, पण त्यानंतरही भारताच्या संघाला तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. एलिस पेरीच्या ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली नाही. पण शेफालीने त्यानंतर ५१ धावांची खेळी साकारत भारताचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण शेफाली बाद झाली आणि भारताचा संघ पराभवाच्या छायेत ढकलला गेला. त्यानंतर भारताला २१ धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी आता घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या १७३ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कारण भारताला स्मृती मानधनाच्या रुपात पहिला धक्का बसला, स्मृतीला यावेळी फक्त एकच धाव करता आली. स्मृतीनंतर फलंदाजीला आलेल्या जेमिमा रॉड्रिगेझने थोडा काळ फलंदाजी केली खरी, पण तिने ११ चेंडूंत तीन चौकारांच्या जोरावर १६ धावा केल्या. जेमिमाला यावेळी १६ धावा करता आल्या असल्या तरी तिने टी-२० क्रिकेटमध्ये १५०० धावांचा पल्ला पार केला आहे. भारताचे एकामागून एक विकेट्स पडत असल्या तरी दुसऱ्या टोकाकडून शेफाली वर्माने गोलंदाजीचा चांगलाच प्रतिकार केला. शेफालीने यावेळी ४१ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५१ धावांची दमदार खेळी साकारली. शेफालीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघ विजयाचे स्वप्न पाहत होता. पण मोक्याच्या क्षणी ती बाद झाली. शेफाली बाद झाल्यावर कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. पण कौर ३७ धावांवर बाद झाली आणि सामना भारताच्या हातून निसटला.

भारताने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना एकच धडाका उडवून दिला. कारण पहिल्याच षटकात भारताने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का देत त्यांची १ बाद २ अशी अवस्था केली. त्यानंतर दुसऱ्या षटकातही भारताने ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या षटकात २ बाद ५ अशी स्थिती केली होती. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियातची एलिस पेरी खेळायला आली आणि तिने धडाकेबाज फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरल्याचे पाहायला मिळाले. कारण पेरीने यावेळी फक्त ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला आणि त्याचबरोबर संघाची धावगतीही वाढवली. पेरीने यावेळी ४७ चेंडूंत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७५ धावांची झुंजार खेळी साकारली. पेरीच्या या ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला २० षटकांत ८ बाद १७२ अशी धावसंख्या उभारता आली. पेरीला यावेळी ग्रेस हॅरी (४१ धावा) आणि ब्रेथ मुनी (३० धावा) यांनी चांगली साथ दिली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला या सामन्यात धावांचा डोंगर उभारता आला.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here