जालना : मुलगी काहीही न सांगता घरातून निघून गेल्याने समाजात अपमान झाल्याचा राग मनात धरून क्रूर पित्याने आपल्या पोटच्या मुलीला फाशी देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसंच ही बाब कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून आरोपी बापाने घाईगडबडीत मुलीचा अंत्यविधीही उरकल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेनं जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोहार, पोलीस निरीक्षक झलवार यांना आपल्या पथकासह जालना राजूर रस्त्यावर गस्त घालत असताना पिरपिंपळगाव शिवारामध्ये संतोष भाऊराव सरोदे या व्यक्तीने त्याच्या मृत मुलीचा घाईघाईने अंत्यविधी केला असून यात काहीतरी काळेबेरे असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी पिरपिंपळगावचे पोलीस पाटील बावणे यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर संतोष भाऊराव सरोदे यांच्या शेतातील वस्तीवर जाऊन संतोष भाऊराव सरोदे व नामदेव भाऊराव सरोदे यांना पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस करताच घटनेचा उलगडा झाला.

आपला मुलगा पतंग उडवत असेल तर लक्ष असू द्या!, बुलढाण्यात पतंग उडवताना घडली दुर्दैवी घटना

पोलीस चौकशीत आरोपीने सांगितलं की, १७ वर्षीय मुलगी सुरेखा ही मागील २ ते ३ दिवसांपूर्वी घरातून निघून गेली होती आणि ती मंगळवारी दुपारी घरी आली. त्यानंतर न सांगता का गेली व कुठे गेली याची विचारपूस आम्ही केली. त्यावरून आमच्यात वादही झाला होता. घरातील तरुण मुलगी कुणालाच काहीही न सांगता निघून गेली, ही बाब आजूबाजूला माहीत झाल्याने आमचा अपमान झाला होता. त्यामुळे संतापातून दुपारी ४ वाजताच्या दरम्यान तिला कडुलिंबाच्या झाडाला दोरीने गळफास देऊन ठार मारलं, अशी कबुली आरोपीने दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी तत्काळ परिसराची पाहणी केली असता पोल्टी फार्मच्या लगत अंत्यविधी केल्याचे लक्षात आले. तसंच अंत्यविधीनंतरची राख पोत्यात भरून ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी वेगाने तपास करत संतोष भाऊराव सरोदे व नामदेव भाऊराव सरोदे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रागात वडिलांनी उचललेल्या क्रूर पावलामुळे तरुणीला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here