gram panchayat election, बायको निवडणुकीला उभी, प्रचारासाठी उतरलेल्या माजी आमदार पुत्राने दिली थेट धमकी; पराभव झाल्यास… – ex mla dinkarrao jadhavs son threatened voters during the gram panchayat election campaign
कोल्हापूर : माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र विश्वजीत जाधव यांच्याकडून मतदारांना धमकी देण्यात आली आहे. भुदरगड तालुक्यातील तिरवडे येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रचारामध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचवार्षिक निवडणुकीकरता तिरवडे-कुडतरवाडी ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सदर निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या स्नुषा शुभांगी विश्वजीत जाधव यादेखील ही निवडणूक लढवत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने १३ डिसेंबर रोजी रात्री कोणतीही कायदेशीर प्रशासकीय परवानगी न घेता बेकायदेशीररित्या शुभांगी जाधव यांच्या सांगण्यावरून विश्वजीत जाधव यांनी तिरवडे येथील लोकांचा जमाव करुन कुदरवाडी इथं सभा घेतली. सीमाप्रश्नी वरिष्ठांची बैठक, हायव्होल्टेज मिटिंगला फक्त महाडिकांनाच संधी, मोठ्या जबाबदारीचे संकेत!
यावेळी मतदारांना व विरोधी पॅनेलच्या उमेदवारांना “मागच्या वेळी वाचलास” काय वाट्टेल ते झाले तरी आम्हाला येथे “शुभांगीची जागा निवडून येणे गरजेचं आहे, जर शुभांगीचं काय झालं तर वाईट परिणाम होणार, एवढंच सांगतो” असं म्हणत विश्वजीत जाधव यांनी सामाजिक शांतता भंग करण्याच्या कायदेशीर सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक वक्तव्य केलेलं आहे. तसंच मतदारांना धमकावून भीती दाखवत आचारसंहितेचा भंग केला आहे, असं पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, ‘या वक्तव्यामुळे मतदारांच्या मनामध्ये भीतीचं व दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सदरचा प्रकार हा अत्यंत गंभीर असून निवडणुकीच्या कालावधीमध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींनी मतदारांना जाहीर पद्धतीने धमकावलं आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकडे केली आहे,’ अशी माहती माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर यांनी दिली आहे.