मनोज बक्षानी असे गुन्हा दखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून या संदर्भात कुणाला सांगितलं तर खोटे गुन्हे दाखल करण्याची आणि नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी त्याने दिल्याचे देखील तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी एका महिला कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार दीड महिन्यापूर्वी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास आणि त्यानंतर वेळोवेळी सेवा विकास बँकेच्या पिंपरी येथील मुख्य कार्यालयामध्ये घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही सेवा विकास बँकेमध्ये शिपाई म्हणून नोकरी करते. दीड महिन्यापूर्वी आरोपी मनोज बक्षानी याने या महिलेला चहा आणण्यासाठी सांगितले. ही महिला चहा घेऊन गेली असता त्याने टेबलाखाली नीट स्वच्छता केली नसल्याचे दाखवले. त्यावेळी ही महिला टेबलाखाली घाण आहे का हे बघण्यासाठी वाकली असता आरोपीने तिच्या शरीराला अश्लील स्पर्श करीत विनयभंग केला.
त्यानंतर देखील त्याने वारंवार अशा प्रकारची कृत्य केले. मात्र, असले प्रकार सहन न झाल्याने पीडित महिलेने अखेर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत फिर्याद दाखल केली. या घटनेमुळे बँकेमध्ये तणावाचे वातावरण पसरले असून अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.