वाळूजच्या समता कॉलनीत सूर्यकांत गोरखनाथ शेळके यांचे दोन मजली घर आहे. त्यांनी तळमजल्यावर सात तर वरच्या मजल्यावर तीन खोल्या बांधल्या आहेत. सात महिन्यांपूर्वी शेळके यांनी काकासाहेब भुईगड यांना तळमजल्यावर दोन खोल्या भाडेत्वावर राहण्यासाठी दिल्या होत्या. भुईगड हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते. मात्र, तीन महिन्यांपूर्वी आपण नवरात्रीसाठी गावी जात असल्याचे सांगून भुईगड कुटुंबासोबत निघून गेले होते.
शेळके यांनी ते कधी येणार तसेच भाडे कधी देणार याबाबत भुईगड यांना अनेकदा फोन केले. मात्र, त्यांनी त्यांना काहीच उत्तर दिले नाही. त्यांनी त्यांच्या गावी देखील चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या खोलीचे कुलूप तोडले. दार उघडल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. घरात त्यांना सामान दिसले नाही. तसेच स्वयंपाक घरात ओट्याजवळ त्यांना खोदकाम केलेले दिसले. तसेच त्या ठिकाणी शेंदूर लावलेले दोन दगड आणि लिंबू ठेवलेले त्यांना दिसले.
त्यानंतर त्यांना संशय आल्याने त्यांनी खोदकाम केले. काही वेळाने त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशवीत मिठात गुंडाळलेल्या अवस्थेत असलेला मानवी सांगाडा त्यांना दिसला. त्यांनी याची माहिती तात्काळ वाळूज पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल होऊन वाळूज पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान, सांगाडा हा उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.