नगर जिल्ह्यात मार्च महिन्यात पहिला करोना बाधित रुग्ण आढळला होता. ३० जूनपर्यंत बाधितांची संख्या ४६५ पर्यंत गेली होती. जुलै महिन्यात मात्र जिल्ह्यात करोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला. त्यामुळे प्रशासनासमोरील चिंता वाढली होती. त्यातच मागील आठवड्याच्या अखेरीस करोना आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे काही प्रमाणात प्रशासनाला दिलासा मिळू लागला होता.
रविवारी (१९ जुलै) सकाळी करोनामुक्त झालेल्या १०५ जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ५१६ वर आली होती. त्यामुळे करोनाची परिस्थिती नियंत्रणात येऊ लागल्याची स्थिती होती. मात्र, आता गेल्या दोन दिवसात पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. काल, नगर जिल्ह्यात तब्बल ३४१ करोना रुग्णांची एकूण रुग्णसंख्येत भर पडल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा दोन हजाराच्या पुढे गेला होता. त्यातच आज पुन्हा जिल्ह्यामध्ये १६५ करोना बाधित वाढले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील बाधितांचा आकडा हा २ हजार १९२ झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २३३ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. तर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही ९१५ झाली आहे. जिल्ह्यात करोनामुळे ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.
वाचाः
दरम्यान, नगर जिल्ह्यात आता पुन्हा करोनाचा विळखा घट्ट होत चालला असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. बाधितांचा आकडा हा आता दोन हजारांच्या पुढे गेल्यामुळे करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अधिक कडक अंमलबजावणी करण्याचे नियोजन प्रशासकीय स्तरावर सुरू करण्यात आले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times