जळगांव जामोद तालुक्यातील मडाखेड बु. ग्रामस्थांनी समाजासमोर एक आदर्श ठरावा असा निर्णय ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्व ग्रामस्थांना एकत्र घेत बिनविरोध निवडणूक घडवून आणली. त्यात सुद्धा एक अनोखा आदर्श ठेवला गेला. सरपंच पदासह सर्व नऊ जागांवर महिलांना संधी देण्याची भूमिका यावेळी गावकऱ्यांनी घेतली. राजकारणात महिलांना संधी द्यावी त्यांच्या हाती नेतृत्व असा या दृष्टिकोणातून घेतलेला हा निर्णय समाजाला आदर्श ठरेल असाच आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातून या निर्णयाचे कौतुक होत आहे.
सौ. सरस्वती हंतोडे, स्वाती तायडे, रूपाली पाटील, पूनम सातव, दुर्गा ठाकरे, मुक्ता सोनोने, वंदना फासे, लता सोनोने या ९ महिलांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झालीये. तसेच सरपंच पदासाठी एकाच घरातील दोन महिला सौ. राजकन्या सोळके व सौ. भागीरथी सोळके यांनी अर्ज भरले असून त्यातील १ अर्ज मागे घेतला जाणार असल्याचे मडाखेड ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. महिलांना प्रतिनिधित्व देन्याच्या या निर्णयाचं माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. स्मितलताई पाटील यांनी स्वागत करुन ग्रामस्थांचे आभार मानले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच विजय कड, सुरेश पाचपोर, सुभाष पाटील, पांडुरंग घोंगे, छोटू पाटील, गोपाळराव मानकर, प्रल्हाद कड, संतोष बेलोकार, मधुकर घोंगे, विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले.