मूळचा मध्यप्रदेश येथे राहणारा सुरज शंकर सिंग उर्फ वीरेंद्र शंकर मिश्रा (वय ३२) हा आरोपी सध्या भिवंडी परिसरात राहत होता. बाल लैंगिक अत्याचार केल्याने १० वर्षांचा तुरुंगवास भोगणाऱ्या सूरज उर्फ विरेंद्रची १४ नोव्हेंबरला तुरूंगातून सुटका झाली होती. त्यानंतर तो कल्याणमध्ये आला असता विरेंद्रची नजर कल्याण येथील महात्मा फुले परिसरातील एका इमारतीच्या खालील फुटपाथवर झोपणाऱ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर पडली.
आपल्या बाबांच्या कुशीत सुरक्षित झोपलेल्या चिमुरडीला त्याने हळूच उचलून बाजूला केले. त्यानंतर या चिमुरडीला काही अंतरावर नेत त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिच्या गळ्यावर चाकूने वार करत तिचा निर्दयपणे हत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळांनी धाव घेत जागेची पाहणी करत तपासाला सुरुवात केली. यासंदर्भात त्यांनी एका संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते.
मात्र, तपासाचा वेग वाढल्यानंतर हे कृत्य करणारा तरुण वेगळा असल्याचे त्यांचा लक्षात आले. दरम्यान, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी सूरज उर्फ विरेंद्रचा शोध चालू केला. त्याचा शोध घेण्यासाठी महात्मा फुले पोलिसांनी विविध १० पथके तयार केली होती. पोलिसांनी एक पथक भिवंडी येथील सोनाळे गावात पाठवले होते. यावेळी गावातील काही नागरिकांनी आरोपीला बकरीवर देखील अनैसर्गिक अत्याचार करताना पकडले होते. यातच पोलिसांना शंका आली त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडले आणि अटक केली आहे . दरम्यान, या आरोपीने आधीही कल्याणमध्ये विकृत प्रकार केल्याचे उघड झाले.