नाशिक : नाशिक शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण नाशिकचे ठाकरे गटातील ११ माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. या नगरसवेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. यामध्ये महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि माजी स्थायी समिती सदस्य रमेश धोंगडे यांचाही समावेश आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे नुकतेच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. मात्र संजय राऊत यांच्या दौऱ्यात देखील काही माजी नगरसेवकांची अनुपस्थिती होती. त्यानंतर आता राऊत यांची पाठ फिरताच या माजी नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात आहे. संजय राऊत हे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे संपर्कप्रमुख आहेत. शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतरही नाशिकचा ठाकरे गट आतापर्यंत मजबूत होता. परंतु आता शिंदे गटाने ठाकरे गट फोडत राऊत यांना मोठा धक्का दिला आहे.

मोठी बातमी! राज्यात हिंदुजा समूह करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक, ११ क्षेत्रांत गुंतवणूक करणार

शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांची यादी

शिवसेनेचे नाशिकमध्ये ३२ नगरसेवक आहेत. त्यापैकी ११ जणांनी शिंदे गटात जाणं पसंत केलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ११ माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची या माजी नगरसेवकांनी भेट घेतली. उद्धव ठाकरे शिवसेनेचे नाशिक महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, माजी स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, सुदाम डेमसे, पूनमताई मोगरे, प्रताप महरोलिया, ज्योती खोले, जयश्री खर्जुल, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले, राजूअण्णा लवटे या माजी नगरसेवकांसह सचिन भोसले यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण हीच आपली शिदोरी आहे. त्यांचे विचार तळागाळात पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here