राज्यभरात सध्या गौतमी पाटील या लावणी कलावंताची प्रचंड चर्चा आहे. गौतमी पाटील जसजशी प्रसिद्ध होत आहे तसतसा तिच्या लावणीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यातही अडकताना पाहायला मिळत आहे. अश्लील हावभाव केल्याचा आरोप करत काही संघटनांनी तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर काही ठिकाणी गर्दीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत आहे. काल रात्री बीडमध्ये झालेल्या कार्यक्रमातही असाच गोंधळ पाहायला मिळाला.
आयोजक आणि पोलीस प्रशासनाच्या कमकुवत नियोजनामुळे हा गोंधळ झाल्याचं बोललं जात आहे. हा गोंधळ शांत करण्यासाठी आणि तरुणाईला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र बीड-परळी महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागला.
दरम्यान, दिवसेंदिवस गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ वाढत असल्याने पोलीस यंत्रणा हा गोंधळ नियंत्रित करण्यासाठी काय पावलं उचलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.