बुलढाणा : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांचं ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठं योगदान राहिलं आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांममधून शिक्षण घेऊन राजकीय, सामाजिक, उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील शाळेत शिकणारे विद्यार्थी पुढं जाऊन चांगलं काम करत असल्याचं दिसून येतं. महाराष्ट्रातील ग्रामीण शाळा यशस्वी ठरण्यामध्ये शिक्षकांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांनी महाराष्ट्राच्या प्रागतिक परंपरेला पुढं नेण्यामध्ये मोठं योगदान दिलं आहे. महाराष्ट्रातील संतांनी सेवेला खूप महत्त्व दिलं. संत गाडगेबाबा यांनी सेवेचं महत्त्व महाराष्ट्राला पटवून दिलं. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील ईसोली गावातील श्री शिवाजी विद्यालयाचे शिक्षक हिरा गवई यांनी विद्यार्थ्यांची अनोख्या प्रकारे सेवा सुरु ठेवली आहे. हिरा गवई हे स्वतः वर्ग दहावीचे वर्ग शिक्षक असून ते वर्ग आठवी आणि नववीला देखील शिकवतात.

शिक्षणाचे धडे देणाऱ्या गुरुजींनी विद्यार्थ्यांचा मायने शिवला खिसा
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण नीटनेटकेपणा जणू काही विसरत चालला आहे. विद्यार्थी जीवनात तर शिक्षणाच्या ओझ्यासोबत आता शालेय जीवनात अनेक गोष्टी कालबाह्य होत चालल्या आहेत. यालाच कुठेतरी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी जपावे यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील ईसोली येथे श्री शिवाजी विद्यालयाचे शिक्षक हिरा गवई यांनी एक अनोखा छंद जोपासला आहे.

आपल्या शाळेतले विद्यार्थ्यांचे चुकूनही शालेय गणवेशाचे बटन अथवा काही भाग फाटलेला गणवेश असेल तर लगेच ते आपल्या कडील साहित्याद्वारे त्याला नीटनेटके स्वतः करून देतात.

इतकेच नव्हे विद्यार्थ्यांची नखं वाढलेली असतील तर त्यांच्या जवळ असलेल्या नेलकटरद्वारे काढण्याकरता त्यांना शिकवण देतात. हा त्यांनी त्यांच्या दैनंदिन शिकवण्याच्या जबाबदारी सोबत हा छंद मागील २३ वर्षापासून जोपासला आहे. हिरा गवई यांचा असाच एक व्हिडिओ आता व्हायरल होतोना पाहायला मिळतो. महेश खरात असं त्या मुलाचं नाव आहे.

एकीकडे मुलांना आज प्रत्येक गोष्टीच्या जबाबदारीची जाणीव करून देणे गरजेचे आहे .आज अनेक ठिकाणी नीटनेटकेपणा सुसंस्कृतपणा लोप पावत चालला आहे. विद्यार्थी जीवनाच्या प्रत्येक पावलावर एक जबाबदार आणि मार्गदर्शक शिक्षक म्हणून हिरा गवई त्यांच्यामध्ये सेवा परमो धर्म हे तत्त्व रुजवण्याचं काम करताना दिसून येतं.

श्री शिवाजी विद्यालय इसोली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा ही शाळा सन १९६९ मध्ये स्थापन झाली. ग्रामीण भागात ही माध्यमिक शाळा आहे. तिथे पाचवी ते दहावी असे विद्यार्थी शिकत आहेत. जवळपास ४०० ते ४५० विद्यार्थी शिकत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here