जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीच्या १० जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. मोहाडी हे गाव गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांचं सासर आहे. मागील काळात त्या मोहाडी ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. या ५ वर्षात त्यांनी गावात समाधानकारक विकासकामे करून ग्रामस्थांची कौतुकाची थाप मिळवली. मात्र यंदा याठिकाणी सरपंचपद महिला एसटी कॅटेगरीसाठी राखीव आहे. त्यामुळे भाविनी पाटील यांनी सदस्यपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
भाविनी पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित ग्रामविकास पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर त्यांना गावातीलच भाजपचे कार्यकर्ते शरद पाटील यांनी लोकशाही ग्राम उन्नती पॅनल उभे करून कडवे आव्हान निर्माण केले असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मी मागच्या टर्ममध्ये केलेल्या विकासकामांना मतदारांपुढे ठेवत असून या कामांच्या बळावर आपण यावेळीही आपलं पॅनल निवडून आणू ,जनता विकासाला कौल देईल, असा विश्वास भाविनी पाटील यांनी व्यक्त केला आहे. पाटील यांना विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सी.आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या निवडणुकीत आपलं नशीब आजमावत असून एकाच पक्षाचे दोन पॅनल रिंगणात असलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.