VIDEO – मुंबई सोबत खेळाल तर आगडोंब पेटेल, लाखो लोकांच्या साक्षीने उद्धव ठाकरेंनी भाजपला ललकारलं
उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या रश्मी ठाकरे आज मोर्चामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या. रश्मी ठाकरेंचे हावभाव, त्यांचा मोर्चातील सहभाग पाहून पुन्हा एकदा त्यांचा राजकारणात सक्रिय सहभाग झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशाप्रकारे त्यांची राजकीय कार्यक्रमात येण्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा रश्मी ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात यावं अशी मागणी झाली आहे. यावेळी त्या इतक्या मोठ्या राजकीय मोर्चात सामिल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी शिवसेना, महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे सरकार अडचणीत आलं असताना रश्मी ठाकरे यांनी मोठी जबाबदारी घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर यांच्यासह बंडखोरी केलेल्या आमदारांच्या पत्नींशी रश्मी ठाकरेंनी संपर्क साधला होता. त्यांनी आमदारांच्या पत्नींना फोन करुन आपल्या पतींशी बोलून त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून रश्मी ठाकरे पडद्यामागून शिवसेनेत काम पाहत असल्याचंही बोललं जात आहे.
रश्मी ठाकरे सप्टेंबरमध्ये ठाण्यातील टेंभीनाक्याला नवरात्रीच्या कार्यक्रमातही सामिल झाल्या होत्या. एकनाथ शिंदेचा गड ओळखल्या जाणाऱ्या टेंभीनाका येथील देवीच्या मंडपात त्यांनी पूजाही केली होती. त्यावेळी त्यांनी ठाण्यातील ‘आनंद आश्रम’ला भेट दिली होती.

‘आनंद आश्रमा’त त्यांनी दिवंगत नेते आनंद दिघे यांना श्रद्धांजलीही वाहिली होती. एकनाथ शिंदेंचे गुरू असणाऱ्या आनंद दिघेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘आनंद आश्रम’त जाणं आणि टेंभीनाका येथील नवरात्रीच्या कार्यक्रमात सामिल होणं हा एक राजकीय मेसेज होता असंही बोललं जात होतं. आज शनिवारी झालेल्या मोर्चातही त्या सक्रीयपणे सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं होतं.