पुणे : मतदानाचे साहित्य मतदानकेंद्रावर घेऊन जाताना ट्रकची धडक बसून एका उपशिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेल्हे तालुक्यातील धानेप गावच्या हद्दीत ही घटना घडली असून सागर नामदेव देशमुख (वय ३३ वारंगुसी, ता. अकोले, जि. नगर) असं मृत उपशिक्षकाचे नाव आहे. देशमुख हे कंधारवाडी जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. या अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सागर देशमुख यांची मतदान अधिकारी क्र, ३ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे देशमुख हे पानशेतकडून कादवे मार्गे दुचाकीवरून (क्रमांक एम. एच. १४ – सी. बी. ७३१४) वेल्हे या ठिकाणी मतदान साहित्य वाटप केंद्रावर येत असताना धानेप गावाच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीला अपघात झाला. ही धडक एवढी जोरात होती की, सागर देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

४० वर्षांच्या संसाराची हातानेच राखरांगोळी, क्षुल्लक वादातून वृद्धाने ७० वर्षीय पत्नीला संपवलं

अपघातानंतर जखमी देशमुख यांना तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

दरम्यान, अतिशय प्रामाणिक, कार्यतत्पर अशा शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पूर्ण शिक्षण विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे. देशमुख यांचा तीन वर्ष शिक्षण सेवकाचा कार्यकाल संपल्याने सेवा नियमित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी होता, अशी माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या घटनेबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या अपघातात चांगल्या आणि तरुण शिक्षकाला गमावल्याची भावना त्यांच्या सहकारी शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here