कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील कर्मचारी किरण साबळे व त्यांचे दोन सहकारी यांच्यासोबत ही घटना घडली आहे. गुरुवारी ते कोपरखैरणेतील जगदंब हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी त्यांना वाढलेल्या मटणाच्या ग्रेव्हीची चव नसल्याची तक्रार त्यांनी केली. यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना “खायचे असेल तर खा नाही तर नका घाऊ,” असे प्रतिउत्तर दिलं.
हॉटेल मालक, कर्मचारी फरार
तिघा पोलिसांनी त्यांना ग्राहकांसोबत अशा प्रकारे उद्धट बोलण्याचा जाब विचारला. यावरून हॉटेल कर्मचारी आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी शटर बंद करून पोलिसांना डांबून ठेवून मारहाण केली. यामध्ये तिघेही पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये हॉटेल मालक अक्षय जाधव आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, पोलिसांसोबत अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवर हल्ले होण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने कायद्याचे राज्य राहिलेले नाही, असं सामान्यांचे मत आहे.