नवी दिल्लीः भारत-चीनमध्ये १४ जुलैला कमांडर स्तरावर बैठक झाली. या बैठकीत तणावाच्या ठिकाणांवरून सीमेवरील सैनिक मागे हटवण्यावर चीनने सहमती दर्शवली. पण चीनचा विश्वासघातकी चेहरा पुन्हा उघड झाला आहे. लडाखमध्ये एलएसीवर तणावाच्या ठिकाणांवरून (LAC) चिनी सैनिक मागे हटलेच नाहीए. यामुळे सीमेवरील तणावाची स्थिती कायम आहे. चिनी सैनिक अजूनही तिथे ठाण मांडून आहेत. ९ जुलैनंतर सीमेवर चिनी सैनिकांच्या कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत, असं सूत्रांनी सांगितलं.

दोन आठवड्यांचा कालावधी

सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी गलवान खोऱ्यातील पीपी -14 आणि पीपी -15 येथूनही सैनिक मागे घेण्यात आले होते. हा पहिला टप्पा पूर्ण झाला. दोन्ही देशांचे सैनिक एक ते दीड किलोमीटर मागे हटले आणि त्या ठिकाणी बफर झोन करण्यात आला. यामुळे आमने-सामने असलेले दोन्ही देशांचे सैनिक मागे हटल्याने तणाव काहीसा कमी झाला. पण हॉट स्प्रिंग भागातून बैठकीत ठरल्या प्रमाणे चिनी सैनिक मागे हटलेले नाहीत. पॅंगॉंग भागात फिंगर -4 मधील चिनी सैनिक 9 जुलैला फिंगर -5 पर्यंत मागे गेले.

आता एक आठवडा प्रतीक्षा करा

१४ जुलैच्या कोअर कमांडर स्तरावरील बैठकीनंतर फिंगर- 4 येथून चिनी सैनिक पूर्णपणे मागे हटतील असं वाटत होतं. पण चिनी सैनिक तिथून मागे हटलेले नाहीत. ते अजूनही तिथेच ठाण मांडून आहेत. सैनिक कशा प्रकारे मागे हटतील? यावर कोअर कमांडर स्तरावरील बैठकीत चर्चा झाली होती. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडताना दिसत नाहीए. सैनिक मागे हटवण्यासाठी बैठकीत दोन आठवड्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. आता एक आठवडा उलटून गेला आहे. पहिल्या टप्प्यातही चिनी सैनिक अखेरच्या काही दिवसांमध्ये मागे हटले होते. यामुळे पुढच्या आठवड्यात चिनी सैनिक पँगाँगमधून मागे हटतील, अशी अपेक्षा लष्कराच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. तरीही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे.

चीनवर विश्वास नाही

वाटाघाटी करूनही चीनवर विश्वास ठेवता येत नाही. नुकतेच लेह दौर्‍यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हे स्पष्ट संकेत दिले. आतापर्यंत जी काही प्रगती झाली आहे त्याद्वारे हे प्रकरण सोडवायला हवे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.चीनशी असलेला सीमावाद कधीपर्यंत चालेल आणि तो मिटेल की नाही? याची कुठलीच हमी देता येणार आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले होते. चीन हा वाद हिवाळ्यापर्यंत वाढवेल, अशी शक्यता आहे. पण हिवाळ्यातही चिनी सैनिक मागे हटले नाहीत, तर भारतीय सैन्यही यासाठी सज्ज आहे.

हिवाळ्यासाठी तैनातीची तयारी

एलएसीजवळ ३० हजार अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. एलएसीवर तैनात जवानांसाठी पूर्ण रसद आणि आवश्यक उपकरणं हिवाळ्यापूर्वी पोहोचली जातात. कारण हिमवृष्टीमुळे तिथे किमान सहा महिने तरी रस्ता बंद असतो. सध्या लष्कराकडून अतिरिक्त जवानांसाठीही पूर्ण व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे हिवाळ्यात अतिरिक्त सैनिक तैनात करण्याची आवश्यकता असेल तर अडचण येणार नाही.

युद्धाच्या शक्यतेनेही तयारीला वेग

युद्धाची स्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी भारतीय सैन्याकडून पूर्ण तयारी करण्यात येत आहे. पुढच्या आठवड्यात फ्रान्समधून ५ राफेल लढाऊ विमानं भारताला मिळणार आहेत. त्याचबरोबर एलएसीवर देखरेखीसाठी नौदलाची लढाऊ विमानंही तैनात करण्यात आली आहेत. तसंचडीआरडीओने तयार केलेल्या ‘भारत’ ड्रोनद्वारे नजर ठेवून चीनच्या सर्व बारीक हालचाली टिपण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here