अहमदनगर : स्वातंत्र्यलढा आपण अभ्यासक्रमात शिकवितो. तो लढा पूर्ण झाला. परंतु समतेची लढाई अद्यापही सुरु आहे. त्यामुळे इतिहास विषयात ‘समतेचा लढा’ हा अभ्यासक्रम शिकविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी तरवडी (ता. नेवासा) येथे बोलताना केले.

तरवडी (ता. नेवासा) येथे सत्यशोधक पत्रकार ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांच्या १३७व्या जयंतीनिमित्त दीक्षित यांच्या हस्ते पत्रकारिता व साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. पत्रकारितेचा पुरस्कार महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनचे संपादक अभिजित कांबळे यांना, तर साहित्य पुरस्कार ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीतील मुख्य उपसंपादक योगेश बिडवई यांना ‘कांद्याची रडकथा’ या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला. दयाराम पाडलोस्कर (गोवा, ग्रंथ – बवाळ), प्रा. शिवाजीराव बागल (सोलापूर, ज्ञानमंदिरातील नंदादीप), डॉ. नारायण भोसले (मुंबई, देशोधडी), सारिका उबाळे (अमरावती, कथार्सिस), भारत सातपुते (लातूर, आम्ही फुले बोलतो), प्रा. वसंत गिरी (बुलढाणा, तरुणांचे आयडॉल सुभाषचंद्र बोस), डॉ. प्रतिभा सुरेश जाधव (नाशिक, अस्वस्थतेची डायरी), डॉ. तुकाराम रोंगटे (पुणे, आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर), राकेश सांळुके (सातारा, दख्खण समृद्ध प्रवास), डॉ. शिवलिंग मेनकुदळे (पुणे, प्रबोधनाचा वसा आणि वारसा) यांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

yogesh Bidwai

‘लोकमत’च्या योगेश बिडवई यांना पुरस्कार प्रदान

कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी आमदार नरेंद्र घुले, मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, सचिव उत्तमराव पाटील, उपाध्यक्ष कॉ. बाबा अरगडे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर, पत्रकार सुधीर लंके, प्रकाश पाटील, ॲड. संभाजी बोरुडे आदींची उपस्थिती होती.

दीक्षित यांनी आपल्या भाषणात मुकुंदराव पाटील यांच्या सत्यशोधक पत्रकारितेचा आढावा घेतला. ते म्हणाले, फुले यांच्या मृत्यूनंतर राज्याला चाळीस वर्षे त्यांचा विसर पडला होता. फुलेंमध्ये वैगुण्य नव्हते तर आपल्या दृष्टीत वैगुण्य होते. प्रबोधन परंपरेत सर्वांत जहाल, विद्रोही व बहुजनवादी चळवळ म्हणजे सत्यशोधक चळवळ आहे. ही वैश्विक चळवळ आहे. मुकुंदराव पाटील यांनी तरवडीसारख्या खेड्यातून ‘दीनमित्र’ हे नियतकालिक चालवून ही चळवळ खेडोपाडी पोहोचली होती, हे दाखवून दिले. त्यांनी पत्रकारितेतून व साहित्यिक लेखनातून मूल्यांचा प्रसार केला. त्यांनी सत्यशोधक चळवळीला पुरोगामी हिंदुत्त्वाची व वारकरी परंपरेची जोड दिली.

दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील पत्रकारिता महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचे संपादक अभिजीत कांबळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘सत्यशोधन हाच बातमीदारीचा आत्मा असावा. म्हणून दिनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांच्या नावाने पुरस्कार मिळावा हे माझ्यासाठी आनंदाचा, अभिमानाचा व जबाबदारीचा क्षण आहे’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here