औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच दुहेरी हत्याकांडाची घटना पैठण तालुक्यातील फारोळा गावात घडली आहे. वृद्ध दाम्पत्याच्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी गळा दाबून हत्या केली. तसंच मृत महिलेच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेल्याची माहिती समोर आली आहे. भीमराव खरनाळ (वय -६५) आणि शशिकला खरनाळ (वय-५८) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पैठण रस्त्यावर असलेल्या फारोळा गावात वृद्ध खरनाळ दाम्पत्य वास्तव्यास होते. शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश करून दोघांना मारहाण केली आणि गळा दाबून दोघांची हत्या केली. हत्येनंतर शशिकला यांच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. यावरून ही हत्या चोरीच्या उद्देशाने करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

VIDEO: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात; १ ठार, ६ गंभीर जखमी

रविवारी फारोळा गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू होती. त्याच दरम्यान वृद्ध दाम्पत्य घरात मृत अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती प्राप्त होताच बिडकीन पोलिसांनी घटनस्थाळी धाव घेत श्वानपथक, तसेच ठसे तज्ञांना पाचारण केले. पोलिसांनी घटनस्थळाची पाहणी करून दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बिडकीन रुग्णालयात हलवले.

दरम्यान, मतदानाच्या दिवशीच दुहेरी हत्याकांडाची घटना गावात घडल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांची विविध पथके आजूबाजूच्या परिसरातील दुकाने, घरावरील व महामार्गावरील सीसीटीव्हींची तपासणी करत आहेत. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here