नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज महाविकास आघाडीतील नेत्यांनी विविध प्रश्नांवरून सरकारला घेरत विधानभवनाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. ‘कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे, महाराष्ट्रद्रोह्यांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,’ अशा घोषणा देऊन विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. या घोषणाबाजीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडे यांच्यासह महाविकास आघा़डीचे सर्व आमदार सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत केलेल्या बंडापासून विरोधकांकडून ‘५० खोके, एकदम ओके’ अशी घोषणाबाजी करत शिंदे यांना डिवचलं जात आहे. नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशनातही या घोषणेनं मुख्यमंत्र्यांची पाठ सोडली नाही. ‘५० खोके, एकदम ओके’ असे बॅनर झळकावत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अधिवेशनाच्या तोंडावर राजकीय वर्तुळात खळबळ;आमदार बाबा आत्राम यांना धमकी

दरम्यान, सरकारविरोधात हल्लाबोल करण्यासाठी अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आदिती तटकरे, अशोक चव्हाण, राजेश टोपे, एकनाथ खडसे, अंबादास दानवे, नाना पटोले यांच्यासह इतर आमदार उपस्थित होते.

सरकारकडून खबरदारी म्हणून शाई पेनावर बंदी

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. यंदा प्रथमच विधान भवन परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास प्रतिंबध घालण्यात आला आहे. भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्लाचे प्रकरण राज्यभर गाजले होते. या प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून विधानभवन परिसरात शाईच्या पेनावर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शाई पेनावर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here