म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

करोना पॉझिटिव्ह असताना एका महिलेने सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना चुकीची माहिती देऊन सोसायटीमधून थेट गाठल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आता हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंदना मोनील ठक्कर (वय ३०, रा. पुनावळे) या महिलेवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठक्कर यांनी पुनावळ्यातील व्हिजन इंद्रमेघ या सोसायटीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या लॉकडाउनपूर्वी दुबईहून पुण्यात आल्या होत्या. मात्र, लॉकडाउनमुळे परदेशातील विमानसेवा बंद झाल्याने त्या पुण्यात चार महिने अडकून पडल्या. दरम्यान, ठक्कर यांना करोनाची लागण झाली. ११ जुलैला थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. ही माहिती संबंधित रुग्णालयाने पालिका प्रशासनाला १२ जुलैला दिली. ठक्कर यांनी घरातच विलगीकरणात राहण्याचा पर्याय निवडला. प्रशासनाने संबंधित सोसायटीला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले. सोसायटीच्या अध्यक्षांनी ‘होम आयसोलेशन’च्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. सोसायटी कार्यालयातील एक कर्मचारीदेखील ठक्कर यांच्या सेवेसाठी देण्यात आला.

दरम्यान, १७ जुलैला त्या सोसायटीच्या गेटवर आल्या. सुरक्षारक्षकांना ‘मेडिकलमध्ये जाऊन येते’ असे खोटे सांगून त्या बाहेर पडल्या. त्या परत आल्या नाहीत. ठक्कर फ्लॅटमध्ये नसल्याची माहिती सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. गेटवरील नोंदवहीत त्यांनी दिलेली सगळी माहिती खोटी होती.

सर्वजण त्यांचा शोध घेत असताना सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या मोबाइलवर मेसेज आला. ‘मी शारजा येथे पोहोचले आहे. माझी करोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.’

पदाधिकाऱ्यांनी थेट हिंजवडी पोलिस ठाणे गाठून पोलिसांना याबाबत माहिती दिली. ‘संबंधित महिला आम्हा सर्वांसह सरकार, पोलिस, महापालिका या सर्वांना फसवून पळून गेली आहे. पॉझिटिव्ह असताना त्यांना विमानाचे तिकीट कसे मिळाले. सोसायटी प्रवेशद्वारावरील नोंदवहीत त्यांनी नाव, फ्लॅट नंबर, संपर्क क्रमांक चुकीचा दिला आहे. बाहेर पडण्याचे कारणही चुकीचे दिले आहे,’ असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत तपास सुरू असून परराष्ट्र मंत्रालयामार्फत चौकशी केली जाणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here