करोना संसर्गाच्या काळामध्ये रुग्णांना दिलासा मिळावा, त्यांची लूट होऊ नये यासाठी सरकारने दरनियंत्रण केले. म. फुले आरोग्यदायी योजनेंतर्गत गरजू रुग्णांसाठी विनाशुल्क वैद्यकीय उपचारांचाही दिलासा दिला. तरीही मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील काही मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची अक्षरशः लूट सुरू आहे. रुग्णालयांनी लूट केलेल्या अशा रुग्णांच्या नातेवाईकांकडून ‘मटा’ने बिले मिळवली आहेत. यामध्ये जैववैद्यकीय कचरा, उशीचे अभ्रे, वापरलेल्या चादरी, निर्जंतुकीकरण अशा बाबींचाही भार रुग्णांवर टाकण्यात आला आहे.
वाचा:
सोने गहाण ठेवून, बँकांमधील अमानत रकमा मोडून, प्रसंगी घरही गहाण ठेवण्याची व विकण्याचीही तयारी ठेवून करोनावरील उपचारांसाठी रुग्णांचे नातेवाईक खेपा घालत आहे. मात्र, अनेक बड्या रुग्णालयांनी भरमसाठ बिले आकारून करोनाचा धंदावाढीसाठी वापर केला आहे. जैववैद्यकीय कचऱ्यासाठी दररोज ७५० रुपयांच्या हिशेबाने रुग्ण जितके दिवस रुग्णालयामध्ये दाखल असेल तितक्या दिवसांसाठी पैसे लावण्यात आले आहेत. सॅनिटायजर तसेच रुग्णालयातील वॉर्ड निर्जंतुकीकरण करण्यासाठीही दररोज ८०० ते हजार रुपयांची दरआकारणी प्रत्येक रुग्णांकडून करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह तपासण्या जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत केलेल्या चाचण्यांसाठी २८०० ते ३२०० रु. असा दर लावण्यात आला आहे. घरी येऊन खासगी प्रयोगशाळांकडून २५०० रुपयांची दरआकारणी करत असतील, तर रुग्णालयांकडून एकत्रित केल्या जाणाऱ्या स्वॅब चाचण्यांसाठी २८०० ते ३ हजार रुपयांचे दर कोणत्या आधारे लावले, अशी विचारणा करण्यात आली आहे. ऑक्सिजन लावण्यासाठी प्रति दिन ८५० ते एक हजार रुपये लावण्यात आले आहेत. जैववैद्यकीय कचरा पालिकेकडून नेला जातो. तरीही त्याचे पैसे आकारण्यात येतात.
वाचा:
पीपीई किटच्या वापरासंदर्भात अत्यल्प दरातील नफा ठेवण्याचे निर्देश दिलेले असतानाही प्रत्यक्षात मात्र प्रति दिवस साडेसातशे ते हजार रुपये दर लावून रुग्णालयांनी अक्षरशः हात धुवून घेतले आहेत. अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेल्या तीन ते चार रुग्णांसाठी तपासणी करणारा डॉक्टर एकच पीपीई किट वापरत असेल, तर सर्व रुग्णांकडून पैसे का उकळण्यात येतात, असा थेट प्रश्न रुग्णांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. पीपीई कुठे वापरायचे याचे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले असताना जनरल वॉर्डमध्ये पीपीई वापरून त्यासाठी पैसे उकळण्यात येतात. रुग्णालयातील संसर्ग नियंत्रणासाठी दादरमधील ट्रस्ट रुग्णालयाने प्रति दिवस तीन हजार रुपये दर लावला आहे. आयसीयू खाटांसाठी प्रत्येक रुग्णालयातील दर प्रति दिवस सहा, नऊ, साडेदहा हजार रु. अशा मनमानीपणे आकारण्यात येत आहे.
‘मटा’कडे ठाणे, मुंबई, डोंबिवली येथील रुग्णांना उपचार देताना केलेल्या अवास्तव दरआकारणीची बिले आहेत. तक्रार केल्यास पुन्हा गरज लागली तर रुग्णालयामध्ये खाट मिळणार नाही, ही भीतीही सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे. मुंबईमध्ये पालिका रुग्णालयांमध्ये खाटांची उपलब्धता असली तरीही ठाणे, डोंबिवली, कल्याण, नालासोपारा या ठिकाणी मात्र खाटांची उपलब्धता नाही. मुंबईतील लोकप्रतिनिधींमार्फत येथील रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी दबाव वाढत आहे. रुग्णालयामध्ये दाखल होताना पिवळे, केशरी रेशनकार्ड असेल तर आरोग्यदायी योजनांचे लाभ मिळतील, हा भ्रम प्रत्यक्ष खासगी रुग्णालयांमध्ये बिल भरताना खोटा ठरत असल्याचे बिलाच्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या रुग्णमित्र संघटनेचे जितेंद्र तांडेल यांनी सांगितले.
सर्वसामान्यांना करोना संसर्गाच्या काळामध्ये दिलासा मिळावा यासाठी वैद्यकीय निकषांच्या आधारे विस्तृत अभ्यास करून म. फुले योजनेच्या अंतर्गत दरनिर्धारित करण्यात आले आहेत. या योजनेच्या अंतर्गत जी रुग्णालये येतात त्यांनी हे उपचार निशुल्क द्यायचे आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णालयांमध्ये खाटांच्या संख्येनुसार दर निर्धारित केले आहेत. हे नियम पाळायचे असतील तर कडक कारवाई करण्याची भूमिका संबधित प्रशासनाने घ्यायला हवी, असे मत म. फुले आरोग्य योजनेचे प्रमुख डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केले.
‘कुणाचीही गय करणार नाही’
रुग्णांची पिळवणूक करणाऱ्या कोणत्याही रुग्णालयाची गय करणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश संबधित प्रशासनाला दिलेले आहेत. दबाव-प्रभावाखाली येऊन कोणत्याही रुग्णालयाला पाठिशी घालण्याची गरज नाही. असे गैरप्रकार दिसल्यास नेमून दिलेल्या यंत्रणांनी संबधित रुग्णालयावर तत्काळ कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. गरज पडल्यास अशा रुग्णालयांचे परवानेही रद्द करण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
मनमानी…
– जैववैद्यकीय कचरा – दररोज ७५० रु.
– सॅनिटायजर, निर्जंतुकीकरण – दररोज ८०० ते १ हजार रु.
– करोना चाचण्या – २८०० ते ३२०० रु.
– ऑक्सिजन – दररोज ८५० ते १ हजार रु.
– पीपीई किट – दररोज ७५० ते १ हजार रु.
ठाण्यात ४० टक्के बिलांवर आक्षेप
ठाणे : ठाणे महापालिकेकडून नियुक्त लेखा परीक्षकांच्या पथकाकडून खासगी करोना रुग्णालयांकडून आकारण्यात आलेल्या बिलांची झाडाझडती होत आहे. आत्तापर्यंत या पथकाकडे १५ कोविड रुग्णालयांमधून एकूण १७५२ बिले प्राप्त झाली. त्यापैकी ४८६ बिलांची तपासणी करून एकूण १९६ (४० टक्के) बिलांमधील २७ लाख रुपयांच्या रकमेवर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. या बिलांविषयी संबधित रुग्णालयांकडे स्पष्टीकरण मागवून अतिरिक्त बिल घेतल्याचे स्पष्ट झाल्यास ही रक्कम रुग्णांना देण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी दिले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times