राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’मध्ये ‘रामायण’ अशा शीर्षकाखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. राम मंदिर आंदोलनाच्या इतिहासाची उजळणी यातून करण्यात आली आहे. ‘रामायण हा हिंदुस्थानी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जोवर चंद्र-सूर्य आहेत, तोवर रामायण आहे. त्या चंद्र- सूर्याच्या साक्षीने पंतप्रधान राममंदिराचे भूमिपूजन करतील. त्या एका क्षणासाठीच २८ वर्षांपूर्वी लाखो रामभक्त अयोध्येत पोहोचले होते. त्यांनी पोलिसांच्या बंदुका आणि गोळ्यांना जुमानले नाही. अशा असंख्य रामभक्तांच्या त्यागातून राममंदिर भूमिपूजनाचा दिवस उजाडत आहे. बाबराचा अयोध्येशी संबंध हा आक्रमणापुरताच होता. ते आक्रमण आणि बाबरीचे अतिक्रमणही लाखो कारसेवकांनी उद्ध्वस्त केले. त्यात होती. अनेकांचे योगदान त्यात आहे,’ असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. “अयोध्या रामाचीच! मंदिर तेथेच होईल” असा निर्णय देणारे माजी सरन्यायाधीश व राज्यसभेचे विद्यमान खासदार रंजन गोगोई यांना भूमिपूजन सोहळ्यात मानाचे पान मिळायलाच हवे, अशी अपेक्षाही शिवसेनेनं व्यक्त केली आहे.
लालू यादव यांना याचे श्रेय द्यावे लागेल!
‘रामजन्मभूमी आंदोलनाचा पाया आणि कळस उभारणारे अशोक सिंघल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात नाहीत. लालकृष्ण आडवाणी यांनी रामाच्या नावाने एक रथयात्रा काढली. त्या यात्रेचे सारथ्य करणारे प्रमोद महाजनही निघून गेले. रामाप्रमाणे आडवाणी वनवासात गेले. बिहारच्या वेशीवर आडवाणी यांची रथयात्रा लालू यादव यांनी अडविली व भडका उडाला. अयोध्या पेटली व कारसेवक आक्रमक झाले. याचे श्रेय शेवटी लालू यादव यांना द्यावे लागेल,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
हा कायद्याचा कसला खेळ मानावा?
‘सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीबाबत निकाल दिल्यावरही बाबरी विध्वंसाचा खटला सीबीआय चालवते व त्यात अयोध्या आंदोलनाचे प्रमुख नेते आडवाणी आरोपी म्हणून हजर राहतात. हा कायद्याचा कसला खेळ मानावा! बाबरी कटाचा खटलाच राममंदिर भूमिपूजनापूर्वी बरखास्त केला तर आंदोलनात शहीद झालेल्यांना ती मानवंदना ठरेल. बाबर हा आक्रमक होता हे एकदा स्वीकारल्यावर बाबरी विध्वंसाचा कट रचला, हा खटलाच गतप्राण होतो, पण रामजन्मभूमीच्या पेचात अडकलेले बाबरी विध्वंस कटाचे त्रांगडे काढायला तयार नाही,’ अशी खंतही शिवसेनेनं व्यक्त केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times