पुणे : राज्यातल्या अनेक शहरातील नागरिक कोयता गँगच्या दहशतीखाली जगत आहेत. कोयता गँगचे वाढते लोण रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करावी, त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मकोका लावा, तडीपार करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट हिवाळी अधिवेशनात केली आहे.

पुण्यातील हडपसर पोलिसांनी हद्दीमध्ये कोणतीही ‘कोयता गँग’ अस्तित्वात नसल्याचे म्हटले असले तरी, ‘हडपसर भागातील वाढती गुन्हेगारी व मांजरी परिसरातील नागरिकांमध्ये असलेल्या ‘कोयता गँग’च्या दहशतीमुळे या गँगवर मकोका’ लावावा, आरोपींना तडीपार करावे. तसेच ‘कोयता गँग’ची दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई करा,’ अशी मागणी अजित पवार यांनी थेट हिवाळी अधिवेशनात केली आहे.

संतापाचा लाव्हा सरकारने अजून ओळखलेला नाही; शिवसेनेकडून शिंदे-फडणवीसांना धोक्याचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून मांजरी परिसरात ‘कोयता गँग’ची मोठी दहशत पसरली आहे. १५ दिवसांपूर्वी मांजरी परिसरातील नागरिकांनी हडपसर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन ‘कोयता गँग’च्या दहशतीबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’नेही बातमीच्या माध्यमातून याचा पाठपुरावा केला होता. या बातमीची दखल घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हडपसर परिसरातील वाढती गुन्हेगारी व ‘कोयता गँग’च्या दहशतीबाबत हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारचे याकडे लक्ष वेधले.

अजित पवार यांनी सभागृहात केलेली मागणी

पुण्यातील मांजरी भागात ‘कोयता गँग’ ची दहशत वाढत आहे. त्यांच्याकडून परिसरातील नागरिकांच्या गाड्यांचे काचा फोडून नुकसान केले जात आहे. भरदिवसा हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली जात आहे. महिलांना दमदाटी केली जात आहे. हे गुंड हॉटेलमध्ये खातात; पण त्याचे पैसे देत नाहीत. मध्यमवर्गीयांच्या गाड्यांच्या काचा फोडतात. असेच प्रकार सातत्याने राज्याच्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात होत आहेत. या प्रकरणी पकडण्यात आलेल्यांपैकी अनेक जण कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ही मुले सोशल मीडियाच्या आहारी गेली आहेत. चित्रपट पाहून, नशा करून अशा प्रकारे गोंधळ घालतात. यामुळे पोलिसांनी ‘कोयता गँग’ ची दहशत मोडून काढण्यासाठी गुन्हेगारांवर ‘मकोका’ लावावा, त्यांना तडीपार करून कडक कारवाई करावी.

कर्नाटकची मग्रुरी सुरूच; महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here