पुणे : पुण्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे यातील बहुतांश अपघात घडत असतात. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड परिसरातून समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव भागात दुचाकीस्वाराला फोनवर बोलणं जीवावर बेतलं आहे. शैलेश गजानन जगताप (वय- २९) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिंपळे गुरव परिसरातील रामकृष्ण मंगल कार्यालय परिसरातून शैलेश जगताप हे काटे पुरम चौकाकडे जात होते. दुचाकीवरून जात असताना शैलेश हे मोबाईलवर बोलत होते. परिणामी रस्त्यावर असणाऱ्या गतिरोधकाचा अंदाज त्यांना आला नाही आणि ते थेट जवळून जाणाऱ्या स्कूल बसच्या मागच्या चाकाखाली पडले. बसच्या चाकाखाली चिरडले गेल्याने शैलेश जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.

श्वास कोंडला, शरीर गार; विमानात कोल्हापूरचा तरुण अस्वस्थ अन् ३२००० फूट उंचीवर घडला चमत्कार

शैलेश यांनी गाडीवर असताना हेल्मेट वापरले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. शैलेश जगताप यांच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, दुचाकी चालवताना प्रत्येकाने हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. तसंच मोबाईल बोलणं टाळावं, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here