‘हॅलो, पोलीस ना, मी चपराशीपुऱ्यातून बोलतोय, मी आत्महत्या करतोय,’ असे कुकने पोलिसांना फोन करून सांगितले. त्यावेळी बीट मार्शलने त्यांना आत्महत्या न करण्याची विनंती केली. काही वेळातच डायल ११२ चे वाहन कुकचा फोन ज्या भागातून आला तिथे पोहोचले. पोलिसांनी त्याचा मोबाईल क्रमांकावरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन करणारी व्यक्ती दिसलीच नाही. त्याचा मोबाईलदेखील बंद होता.
पोलीस फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत असताना शहरातील चपराशीपुरा परिसरातील मनपा रुग्णालयाच्या परिसरात एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती मंगळवारी फिरोज नामक इसमाने फ्रेजरपुरा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतकाजवळ असलेला मोबाईल सुरु केला आणि कॉल डायल ११२ चा कॉलदेखील आढळून आला. त्याचवेळी रामेश्वर सोनोने यांच्या पत्नीचा कॉलदेखील त्यावर आला. त्यामुळे मृताची ओळख पटून रात्रीच्या वेळी डायल ११२ वर कॉल करून आत्महत्या करतो आहे, असे म्हणणाऱ्या व्यक्तीचाच अर्थात रामेश्वरचा तो मृतदेह असल्याची खात्री पोलिसांना पटली. पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली.