नालासोपारा एसटी स्टँडमधून कामावर जाणाऱ्यांसाठी रोज १०० ते १५० एसटी सोडल्या जात आहेत. आज बराचवेळ थांबूनही एसटी स्थानकातून एसटी सोडण्यात आली नाही. चौकशी केली असता एसटी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचा संयम सुटला आणि या संतप्त प्रवाशांनी घोषणाबाजी देत आंदोलन सुरू केलं. या आंदोलनता एक एक करत शेकडो प्रवासी सहभागी झाले आणि एसटी स्थानकात एकच गोंधळ उडाला. आंदोलक प्रवाशांनी तोंडाला मास्क लावलेला असला तरी अचानक शेकडो प्रवाशी एकत्र येऊन घोषणाबाजी करू लागल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यानंतर या प्रवाशांनी रेल्वे स्थानकाच्या दिशेने कूच केली. रेल्वे स्थानकाबाहेर लावलेले बॅरिकेड्स तोडून संतप्त प्रवाशांचा लोंढा अचानक रेल्वे स्थानकात घुसल्याने ड्युटीवरील पोलिसांचीही तारांबळ उडाली.
प्रवाशांनी घोषणाबाजी देतच रेल्वे स्थानकात प्रवेश करत रेल्वे रुळावर उतरून ठिय्या आंदोलन केलं. आम्हीही कामावर जातो. आम्हालाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करत या संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोको केला. शेकडो प्रवासी रेल्वे रुळावर उतरल्याने रेल्वेचा खोळंबा झालाच पण रेल्वे प्रशासनाला या प्रवाशांना हटविण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवावी लागली.
>> नालासोपारा एसटी स्टँड अनिश्चितकाळासाठी बंद
>> खासगी प्रवाशांची संख्या वाढल्याने नालासोपारा येथील एसटी स्टँड बंद
>> खासगी कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये प्रवेश नसल्याने प्रवासासाठी एसटीवर अवलंबून
>> सोमवारपासून खासगी प्रवासी वाढत होते आज मात्र शेकडो प्रवासी सकाळी ९ च्या सुमारास स्टँडवर आले आणि गोंधळ सुरू झाला
>> एसटी कर्मचाऱ्यांनी पोलिसांची मदत घेतली असून, एसटीने प्रवास करू द्या, अशी मागणी प्रवासी करत आहे
>> संतप्त प्रवाशांचा नालासोपारा स्थानकात रेल रोको, रेल्वे पोलीस आणि आरपीएफकडून स्थिती नियंत्रनात
>> जमलेल्या प्रवाशांकडून ज्यादा एसटी गाड्या सोडण्याची मागणी
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times