राजस्थानच्या धौलपूरमध्ये मंदिराच्या पुजाऱ्याचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. पुजाऱ्याचे मृतदेहाचे अनेक तुकडे करून दोन गोण्यांमध्ये भरण्यात आले. दोन्ही गोण्या नदीकिनारी फेकण्यात आल्या. ग्रामस्थांनी गोण्या पाहिल्या आणि गावात खळबळ उडाली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

घटनेची माहिती कंचनपूर पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठून प्लास्टिकच्या गोणीत असलेले मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेतले. ६० वर्षांचे बहादुद्दीन खान गेल्या १० वर्षांपासून टोटरी गावाजवळ असलेल्या पार्वती नदीच्या किनाऱ्यावरील चामण माता मंदिरात वास्तव्यास होते. ते मंदिरात पूजा अर्चा करायचे. बहादुद्दीन खान यांनी १० वर्षांपूर्वी मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्विकारला होता. तेव्हापासून ते चामण मंदिरात पूजा करायचे, तिथेच राहायचे.
बहादुद्दीन खान यांच्या खुनाचं नेमकं कारण अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही. पुजारी बहादुद्दीन यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. चामण माता मंदिराजवळ आणखी एक मंदिर आहे. तिथे तीन साधू राहत होते. बहादुद्दीन यांचा खून झाल्यापासून तीन साधू फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं तयार केली आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.