उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेमुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. पेन्सिलला टोक काढल्यानंतर निघणारी साल घशात अडकल्यानं एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

पेन्सिलची साल श्वसन नलिकेत अडकल्यानं अर्तिकाला त्रास होऊ लागला. वेदनेनं कळवळणारी अर्तिका जमिनीवर लोळू लागली. तिची तडफड पाहून कुटुंबीय चिंतेत होतं. त्यांनी तिला तातडीनं सीएचसीमध्ये नेलं. तिथे डॉ. सत्येंद्र यादव यांनी तिला मृत घोषित केलं. अर्तिका पहिलीत शिकत होती. अर्तिकाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आईची रडून रडून दयनीय अवस्था झाली आहे. कुटुंबीयांनी अर्तिकाचं शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
लहान मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष देणं गरजेचं असल्याचं डॉ. सत्येंद्र यादव म्हणाले. काही मुलं झोपून खातात, पाणी पितात. अशा सवयी घातक ठरू शकतात. श्वसन नलिकेत खाद्यपदार्थ अडकल्यास जीव जाऊ शकतो, असं यादव यांनी सांगितलं. लहान मुलांना वस्तू तोंडात घालण्याची सवय असते. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.