मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणावरून राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी या आरोपांना सुरुवात करताच नंतर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी विधानभवनातही मोठा गदारोळ उडाला. सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणावरून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासह भाजप आमदारांनी आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. या आरोपांना प्रत्युत्तर देताना आज उद्धव ठाकरे समर्थक खासदार संजय राऊत यांनी खासदार राहुल शेवाळे यांना सूचक इशारा दिला आहे.

राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपांविषयी विचारेलल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘हे शेवाळे म्हणजे काय अॅटर्नी जनरल आहेत का? २०२४ ला ते देशाच्या संसदेतही दिसणार नाहीत. त्यामुळे तुम्ही मला त्यांच्याविषयी सांगू नका,’ अशा शब्दांत राऊत यांनी खासदार शेवाळेंना फटकारलं आहे.

संजय राठोड यांच्यावर गोमुत्र शिंपडलं काय? अजित पवार संतापले

काय होता शेवाळे यांचा आरोप?

‘अभिनेता सुशांतसिंह याच्या मृत्यूपूर्वी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या मोबाइलवर ४० हून अधिक फोन आले होते. हा नंबर AU या नावाने तिच्या मोबाइलमध्ये सेव्ह होता. AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा त्याचा अर्थ होता,’ असा धक्कादायक दावा करत राहुल शेवाळे यांनी बुधवारी राजकीय खळबळ उडवून दिली होती.

आदित्य ठाकरे यांचं उत्तर

सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणावरून अधिवेशनात गदारोळ झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘राज्यातील खोके सरकारला ३२ वर्षांच्या तरुणाने हलवून ठेवलं आहे, हे आजच्या प्रकारावरून दिसून आलं. सभागृहात सत्ताधारीच येऊन आंदोलन करतात, असे मी गेल्या अडीच वर्षांत कधीही पाहिले नाही. आम्ही राज्यपाल हटाव ही मागणी सतत करत आहोत. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना वाचवण्यासाठी, मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही एनआयटी घोटाळा उघडकीस आणला आहे. सभागृहात यावर चर्चाच होऊ नये, यासाठी हा मुद्दा उकरून काढला जात आहे’, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here