मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज एकामागून एक कंपन्यांचे अधिग्रहण करत आहे. अलीकडेच रिलायन्सच्या रिटेल कंपनीने मेट्रो इंडिया २,८५० कोटी रुपयांत विकत घेतली, तर आता अंबानीच्या रिलायन्स जिओच्या, रिलायन्स प्रोजेक्ट्स अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंटने रिलायन्स इन्फ्राटेलमधील १०० टक्के हिस्सा ३,७२० कोटी रुपयांत खरेदी केला आहे. याबाबतची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी दिली, ज्यात असे म्हटले की मुकेश अंबानी यांच्या कंपनीने रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीचे टॉवर आणि फायबर बनवणारे युनिट रिलायन्स इन्फ्राटेकचे १०० टक्के अधिग्रहण केले आहे.
एनसीएलटीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता या कंपनीचे अधिग्रहण रिलायन्स जिओच्या हातात येणार आहे. मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ, अनिल अंबानी रिलायन्स कम्युनिकेशनचे प्रमुख असून गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी प्रचंड कर्ज आणि तोट्याचा सामना करत आहे. बऱ्याच दिवसांपासून ते कंपनी विकण्याच्या तयारीत होते, तर आता कंपनीची कमान रिलायन्स जिओकडे पोहोचली आहे. गुरुवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इन्फ्राटेकने RPPMSL ला १० रुपये दर्शनी मूल्य असलेले ५० लाख इक्विटी शेअर्सचे वाटप केले आहे. याशिवाय कंपनीने ३७२ कोटी रुपयांचे शून्य कूपन जारी केले आहेत.
जिओचा फायदा किती
धाकटया भावाची कर्जबाजारी कंपनी विकत घेऊन मुकेश अंबानींना काय फायदा होईल? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात येत असेल. तर रिलायन्स इन्फ्राटेलचा ताबा मिळवल्याने रिलायन्स जिओला त्यांचे नेटवर्क वाढवण्यात मदत होईल. याशिवाय रिलायन्स इन्फ्राटेकची मालमत्ता संपादन केल्याने केवळ घरची कंपनी घरीच राहणार नाही, तर जिओला ग्रामीण आणि शहरी भागात आणि देशाच्या विविध भागांमध्ये आपले नेटवर्कचा विस्तार आणखी मजबूत करण्यास मदत करेल. रिलायन्स इन्फ्राटेककडे मोबाईल टॉवर आणि फायबरचे विस्तृत नेटवर्क आहे. अशा स्थितीत जिओ या नेटवर्कचा वापर गावे आणि शहरांच्या विविध भागात पोहोचण्यासाठी करेल.
रिलायन्स इन्फ्राटेलची मालमत्ता
रिलायन्स इन्फ्राटेलचे देशभरात ४३,५०० टॉवर आणि १,७० हजार किलोमीटरपेक्षा जास्त फायबर नेटवर्क आहे. कर्जबाजारी रिलायन्स इन्फ्राटेलच्या मालमत्तेवर त्वरित कारवाई न केल्यास त्यांचे मूल्य कमी होऊ शकते, असे रिलायन्स प्रोजेक्ट्सने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले.