Authored by महेश गुंडेटीवार | Maharashtra Times | Updated: 23 Dec 2022, 2:27 pm
Baba Amte Lok Biradari : गडचिरोली जिल्ह्याच्या घनदाट जंगलात अतिदुर्गम अशा भामरागडच्या हेमलकसात लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो आदिवासींच्या जीवनाला आधार देणाऱ्या सेवेच्या प्रकल्पाला आज ४९ वर्ष पूर्ण झाली आहेत. या सेवेने आता ५०व्या वर्षी पदार्पण केलं आहे. दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटेंच्या प्रेरणेतून उभ्या असलेल्या या प्रकल्पातून डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटेंसह आमटे कुटुंबियांची तिसरी पीढी या प्रकल्पातून आरोग्य, शिक्षण, सिंचन या कार्याच्या माध्यमातून आदिवासींना सेवा देत आहेत. पुढचे चार दिवस या प्रकल्पात आमटे आठवडा साजरा होणार आहे.

१९७३ मध्ये एका झोपडीतून लोकबिरादरी प्रकल्प सुरू

चारही बाजूंनी घनदाट जंगल, वन्यप्राण्यांचं वास्तव्य, वीजपुरवठा नाही, पिण्याचं शुद्ध पाणी नाही, आदिवासींची संवाद साधण्यासाठी त्यांची मातृभाषाही अवगत नाही, अशा अवस्थेत बाबांच्या उपस्थितीत १९७३ मध्ये एका झोपडीत लोकबिरादरी प्रकल्प सुरू करण्यात आला. हा लोकबिरादरी प्रकल्प एका लहानशा रोपट्याच्या माध्यमातून सुरू होऊन आज वटवृक्षामध्ये परिवर्तित झाला आहे. त्या काळात आदिवासी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी डॉ प्रकाश आणि डॉ मंदाकिनी आमटे यांना खूप कठीण परीश्रम घ्यावे लागले. मात्र त्यांनी माडीया आणि गोंडी या दोन्ही भाषा आत्मसात करुन आदिवासींचा विश्वास संपादन केला.
तापाची साधी गोळीही मिळत नव्हती

हळूहळू आदिवासींना हे लोकबिरादरी प्रकल्प त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे महत्त्वाचे प्रकल्प बनू लागले. आदिवासींना तापाची साधी गोळी मिळत नव्हती. वन्यप्राण्यांचे हल्ले असो किंवा सर्पदंश असो यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या आदिवासींना जीवनदान देण्यासाठी डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांची सेवा कामी आली. लोकबिरादरी प्रकल्पाचे हे रुग्णालय केवळ भामरागडच नव्हे तर लगतच्या छत्तीसगड आणि तेलंगणातल्या आदिवासींसाठी एक आधार देणारं सेवाकार्य बनलं. आरोग्याच्या सोयीसोबतच डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी लोकबिरादरीमध्ये एका शाळेची सुरुवात केली.
तिसरी पिढीही लोक बिरादरी प्रकल्पात सेवाव्रत

या भागात आदिवासींना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या. त्या सोयी लोकबिरादरी प्रकल्पाच्या आश्रम शाळेतून मिळू लागल्या. या आश्रम शाळेतून शिकून अनेक आदिवासी मुले पोलीस, डॉक्टर, अभियंते, ग्रामसेवक, पटवारी शिक्षक या पदावर पोहचली हे विशेष. डॉ प्रकाश आणि डॉ मंदाकिनी यांच्यासोबत आता तिसरी पिढीही लोक बिरादरी प्रकल्पात सेवाव्रत झाली आहे. यामध्ये डॉक्टर दिगंत आमटे आणि त्यांची मोठी सून अनघा व्यवसायाने डॉक्टर आहे. दिगंत आणि अनघा आमटे या दोघांमुळे उपचाराच्या माध्यमातून येथील आदिवासींना नवे जीवन मिळत आहे. लोकबिरादरी प्रकल्पाने शाळेसोबतच या भागातल्या आदिवासींना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
आदिवासी विध्यार्थ्यांना इंग्रजीतून धडे

अनिकेत आमटे आणि समीक्षा आमटे या दोघांच्या नेतृत्वात शैक्षणिक कार्यासह या भागातल्या आदिवासींच्या जीवनाला दिशा देणारी सिंचनाची क्रांतीही केली. लोकबिरादरी प्रकल्पाचं हे रुग्णालय आता सुसज्ज अशा रुग्णालयांमध्ये परावर्तित झालं आहे. तर, नेलगुंडा आणि जिंजगाव सारख्या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागात साधना विद्यालयातून येथील आदिवासी विध्यार्थ्यांना इंग्रजीतून धडे मिळू लागले.
आजपासून आमटे आठवडा साजरा होणार

२३ डिसेंबरला लोकबिरादरी प्रकल्पाच्या वर्धापन दिन असतो. तर २४ डिसेंबरला डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. २५ डिसेंबरला डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचा वाढदिवस आहे. तर २६ डिसेंबरला डॉक्टर प्रकाश आमटे यांचा वाढदिवस आणि कर्मयोगी डॉक्टर बाबा आमटे यांची जयंती आहे. यानिमित्ताने प्रकल्पात विविध कार्यक्रम होणार आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.