IPL 2023 Auction : यावेळी आयपीएलचा लिलाव हा जोरदार झाल्याचे पाहायला मिळाले. पण भारताच्या एकाही खेळाडूला यावेळी १० कोटी रुपयांपर्यंतही पोहोचता आले नाही. पण या लिलावात भारताकडून कोणत्या खेळाडूला सर्वाधिक बोली लागली ही माहिती आता समोर आली आहे. या लिलावात भारताच्या कोणत्या खेळाडूवर सर्वात जास्त बोली लागली होती, जाणून घ्या…

भारतीयांना या लिलावात चांगला भाव मिळाला नाही. भारताचा फक्त एकच खेळाडू या लिलावात चमकला आणि तो खेळाडू ठरला मयांक अगरवाल. कारण या हंगामात मयांक हा भारताचा सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. मयांकला यावेळी सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. मयांकसाठी यावेळी हैदराबादच्या संघाने ८.२५ कोटी रुपये मोजले. आयपीएलच्या या लिलावातील ही सर्वाधिक भारतीय खेळाडूला मिळालेली रक्कम ठरली आहे. मयांक हा यापूर्वी पंजाबच्या संघात होता. पण पंजाबने त्याला यावेळी आपल्या संघात कायम ठेवले नाही, याचा फायदा हैदराबादच्या संघाने उचलला. मयांकला संघात घेत हैदराबादच्या संघाने एका दगडात दोन शिकार केले आहेत. एकतर हैदराबादच्या संघाला धडाकेबाज सलामीवीर मिळाला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे त्यांना कर्णधार असलेल्या केन विल्यमसनला रिटेन केले नाही आणि या लिलावात त्याच्यावर बोलीही लावली नाही. त्यामुळे हैदराबादचा कर्णधार कोण असेल असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता. पण मयांक हा एक चांगला कर्णधार आहे आणि हैदराबादचे नेतृत्व करताना तो आपल्याला पुढच्या हंगामात दिसू शकतो.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.